Sat, Aug 24, 2019 22:14होमपेज › Pune › उत्पादन शुल्क विभागाचे ‘संकेत’ चुकीचे

उत्पादन शुल्क विभागाचे ‘संकेत’ चुकीचे

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:08AM

बुकमार्क करा

पुणे : समीर सय्यद

शासनाकडून आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व विभागांची संपूर्ण माहिती संकेतस्थळार प्रसिद्ध केली जाते. ही माहिती खरी व बिनचूक मानली जाते. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री आणि प्राप्त महसुलाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, ती संपूर्ण माहिती चुकीची असून, वास्तवात पुणे जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या महसुलात 33 तर मद्यविक्रीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे असताना संकेतस्थळावर उत्पादनात आणि विक्रीमध्ये घट झाल्याचे दाखविले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अजब कारभाराचे दर्शन झाले आहे. 

राज्याच्या तिजोरीत दुसर्‍या क्रमांकाचा महसूल मद्यविक्रीतून मिळणार्‍या अबकारी करातून जमा होतो. दरमहा 8 ते 10 तारखेपर्यंत प्राप्त महसूल आणि मद्यविक्रीची संपूर्ण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून ती सार्वजनिक करतो. नोव्हेंबरमध्ये मद्यविक्री आणि प्राप्त महसुलाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात आणि प्रत्यक्षात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. संकेतस्थळावर देशी दारू 14 लाख 96 लिटर विकल्याचे दाखविले असून, प्रत्यक्षात 21 लाख 27 हजार 238 लिटर विकली आहे. 

17 लाख 81 लिटर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विक्री झाल्याचे प्रसिद्ध केले असून, प्रत्यक्षात 26 लाख 53 हजार 531 लिटर मद्य विक्री झाल्याची नोंद पुणे उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. राज्यात मुंबईनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक  1400 बिअरशॉपी, वॉईन शॉप 265 आणि 700 परमिटरूम आहेत. महसुलात आणि मद्यविक्रीतही पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो, असे असताना संकेतस्थळावर नोव्हेंबर 2016 पेक्षा यंदा 9 लाख 42 हजार लिटरने बिअरच्या विक्रीत घट झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात 2 लाख 11 हजार 215 लिटरने 

बिअरच्या विक्रीत वाढ झाली असून 37 लाख 40 हजार 176 लिटर बिअरची विक्री झाली आहे. वाईनच्या विक्रीत 16.86 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 लाख 12 हजार 978 लिटर वाईनची विक्री झाली आहे. यामुळे प्रत्यक्षात महसूल आणि विक्रीत वाढ झालेली असतानाही घट दाखवून उत्पादन शुल्क विभाग काय साध्य करून पाहत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महसुलात 33 टक्क्यांनी वाढ

पुणे कार्यालयाला एप्रिल ते मार्च 2017 या चालू वर्षासाठी 1 हजार 649 कोटी 30 लाख रुपयांच्या महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट आहे. मार्च ते नोव्हेंबर 2017 पर्यंत 941 कोटी 33 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. संकेतस्थळावर नोव्हेंबरमध्ये केवळ आठ कोटी 68 लाख 91 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचे दाखविले आहे. मात्र, प्रत्यक्षात 149 कोटी 82 लाख 46 हजार रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. नोव्हेंबर 2016 पेक्षा यंदा 36 कोटी 95 लाख 58 हजार 833 रुपयांचा अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.