Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Pune › मॅरेथॉनच्या उद्घाटनाला महापौरांनी फिरवली पाठ

मॅरेथॉनच्या उद्घाटनाला महापौरांनी फिरवली पाठ

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:28AM

बुकमार्क करा

पुणे : सुनील जगताप

32 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नसल्याने पुणेकर नागरिकांनीही या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आज मॅरेथॉन मार्गावर दिसून आले. या स्पर्धेच्या स्वागताध्यक्ष असलेल्या आणि प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळकही उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.  मात्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली.

पुणे मॅरेथॉन ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पहाटे 5.30 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथून प्रारंभ करण्यात आला. संयोजकांच्यावतीने पुण्याच्या प्रथम नागरिक प्लॅग ऑफसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले परंतू महापौरांनी उद्घाटनाला उपस्थिती दाखवलीच नाही. विशेष म्हणजे महापालिकेचे नगरसेवक अथवा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.

माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड, स्पर्धा संचालक प्रल्हाद सावंत आणि रोहन मोरे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी पहाटे अंधाराचे प्रमाण अधिक असल्याने पहिल्या पाच किलोमीटरमध्येच आफ्रिकन धावपटूंना अडचणी आल्या. तसेच मार्गावर संयोजकांचे स्वयंसेवक वगळता इतर नागरिक अथवा शाळकरी मुलेही स्वागतासाठी उपस्थित नसल्याने धावपटूंचा उत्साह कमी झाला. 

मॅरेथॉनचा समारोप सणस मैदानावर करण्यात आला. या मुख्य मॅरेथॉनबरोबरच 21 किलोमीटरची पुरुष आणि महिला, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, व्हीलचेअर आणि माझी धाव पुण्यासाठी ही 3 किलोमीटरच्या स्पर्धाही पार पडल्या. माझी धाव पुण्यासाठी या स्पर्धेचा प्लॅग ऑफ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही तीन किलोमीटरची रन टिळक रोड मार्गे अलका चौकातून खंडोजी बाबा चौकात पोहोचणार होती व तेथूनच परत सणस मैदानावर समारोप करण्यात आला.

लाखो रूपये खर्च होऊनही  सिंथॅटिक ट्रॅक दुरवस्थेतच

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप नेहरु स्टेडियमच्या मैदानावर होत असे. परंतू स्टेडियमच्या नुतनीकरणानंतर हा समारोप गेल्या दोन वर्षापासून सणस मैदानावर केला जातो. हा समारोप करताना त्याठिकाणी मैदानावर सिंथॅटिक ट्रॅकची दुरावस्था होत असून त्यावर लाखो रुपये खर्च महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात आलेले आहेत. असे असताना ही महापालिकेच्या वतीने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा काही खेळाडूंमध्ये सुरु होती.