होमपेज › Pune › ‘दगडूशेठच्या श्री राजराजेश्वर मंदिर सजावटीचे गणेश चतुर्थी दिवशी उद्घाटन 

‘दगडूशेठच्या श्री राजराजेश्वर मंदिर सजावटीचे गणेश चतुर्थी दिवशी उद्घाटन 

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 06 2018 7:11PMपुणे : प्रतिनिधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने तामिळनाडू तंजावर येथील श्रीराजराजेश्वर मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन गणेश चतुर्थीला गुरुवार, (दि.  १३ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी महान गाणपत्य श्री गणेश योगद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते श्रीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेश चतुर्थी दिवशी गुरुवारी (दि.१३ सष्टेंबर) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्री ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक लाईटने विद्यतरोषणाई करण्यात येत आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाईचे काम वाईकर बंधू, मंड़प व्यवस्था काळे मांडववाले, रंगकाम सुनील प्रजापती यांनी केली आहे.. शुक्रवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे २० हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी फिनोलेक्स गुपचे प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते २ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील समस्त। वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, मंत्रजागर, महिला हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम उत्सवात होणार आहेत.

दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री व दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्ध तीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग सलग पाच दिवस होणार आहे. दिनांक १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. रुबी हॉस्पिटलचे महिला व पुरुष डॉक्टर २४ तास विनामूल्य आरोग्य सेवा देणार आहेत. तसेच सुसज्ज रुग्णवाहिका देखील असणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक २३ सप्टेंबर रोजी श्रीची वैभवशाली सांगता मिरवणकाविश्वविनायक रथातून निघणार आहे.