Wed, Apr 24, 2019 11:54होमपेज › Pune › घरपट्टी वसुलीत ग्रामसेवकांकडून हयगय

घरपट्टी वसुलीत ग्रामसेवकांकडून हयगय

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:15AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामसेवकांनी 2017-18 मधील घरपट्टी वसुलीत हयगय केल्याने पंचायत विभागाच्या घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट निम्मेही पूर्ण झालेले नाही. ग्रामसेवकांकडून अपेक्षेनुसार वसुली न झाल्याने घरपट्टी वसुलीच्या मनसुब्यावर अक्षरशः पाणी फेरले.  303 कोटींच्या उद्दिष्टापैकी ग्रामसेवकांनी डिसेंबरअखेर 182 कोटी 42 लाखांची वसुली केली आहे. त्यामुळे उर्वरित 121 कोटींची वसुली आर्थिक वर्षातील सुट्या वगळून अवघ्या 31 दिवसांत पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसत आहे.  त्यामुळे घरपट्टीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या गावोगावच्या विकासकामांना आडकाठी निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांत असणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 407 आहे. ग्रामपंचायतींच्या घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्यकर, सार्वजनिक वीजकर व विविध करांद्वारे निधीतून विकासकामांना प्राधान्य देण्यात येते. विशेषतः गावांचा पाणीपुरवठा, दिवाबत्ती, कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी करांच्या वसुलीतून निधी मिळतो. मात्र, गावोगावच्या ग्रामसेवकांकडून घरपट्टी वसुलीस अग्रक्रम न दिल्यामुळे पंचायत विभागाच्या 303  कोटींच्या घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात  2017-18 या  आर्थिक वर्षात अनेक गावांत किमान गरजा पूर्ण न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावोगावी अपेक्षित कर जमा न झाल्याने  पाणीटंचाई, दिवाबत्तीची गैरसोय, विविध समाजोपयोगी सोयीसुविधांवर खर्च करण्यात आला नाही.  2016-17 मधील ग्रामपंचायत कराची 41 कोटी 93 लाखांची वसुली करणे बाकी आहे, तर 2017-18 मधील 261 कोटी 36 लाखांची घरपट्टी मिळून 303 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गावोगावच्या ग्रामसेवकांकडून घरपट्टी गोळा करण्यास प्राधान्य दिले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी पूर्णतः कोलमडली आहे. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामसेवकांकडून घरपट्टी वसुलीचा वेग संथ असल्यामुळे शासनाची तिजोरी रिकामी राहणार आहे.