Sun, Jul 21, 2019 01:40होमपेज › Pune › जावयाने फोडले सासर्‍याचे घर

जावयाने फोडले सासर्‍याचे घर

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

मुलगी अन जावई म्हणजे त्या घरातील प्रमुख अतिथी म्हणा किंवा सर्वात मानाचे पाहुणे. त्यांच्या पाहुणचारात कोणतीच कमी नसते. परंतु, शहरातील एका घटनेने सध्या चांगलीच खळबळ उडविली असून, पोटची मुलगी अन जावयाला विश्‍वासाने काही दिवस घरी राहण्यास परवानगी दिल्यानंतर दोघांनी घर फोडून तब्बल सव्वा सात लाखांचा ऐवजच लांबिवल्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माधव देवकाते (वय 78, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकाते यांची पत्नी जून 2017 मध्ये आजारी होत्या. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्या उपचारासाठी रुग्णालयात होत्या. त्यादरम्यान फिर्यादी हे रुग्णालयात जात असे. त्यावेळी त्यांनी मुलगी आणि जावयाला तात्पुरते राहण्यासाठी घरे दिले होते. मात्र, त्यावेळी दोघांनी फिर्यादी यांची नजर चुकवून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने तसेच रोकड, असा एकूण 7 लाख 35 हजार रुपयांचा माल लंपास केला. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फियादींनी दोघांकडे पैसे व दागिने मागितले. परंतु, त्यांनी आईच्या आजाराला खूप पैसे खर्च झाले असून, त्यातच हे दागिने व रोकड गेल्याचे फिर्यादींना सांगितले.  फिर्यादींनी काही दिवस त्यांची वाट पाहिली. मात्र, पैसे न मिळाल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक शिंदे हे करत आहेत.