Fri, Feb 22, 2019 08:03होमपेज › Pune › खाकी वर्दीचा धाक संपला !

खाकी वर्दीचा धाक संपला !

Published On: Jun 19 2018 1:27AM | Last Updated: Jun 19 2018 12:21AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड शहरात गुंडांकडून नागरिकांवर दहशत पसरवली जात आहे. गेल्या 18 दिवसांत सुमारे 32 वाहनांची गुंडांकडून तोडफोड करण्यात आली. तर खराळवाडी येथे बलात्काराची घटना घडली असून हिंजवडीमध्ये खुनाची घटना घडली. तर एचए कॉलनीमध्येही महिलेवर गोळीबाराची घटना घडली. शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढला असून गुन्हेगारांना पोलिस खाकीचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.

पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडळ तीन अंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसेना झाले आहे. वाहनतोडफोड, खून, खुनी हल्ला, बलात्कार आदी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 10 जून रोजी हिंजवडी परिसराती नेरे-जांबे रस्त्यावर प्रियेसीसाठी पतीने आपल्या पत्नीचा व मुलाचा खून केला. या दुहेरी खुनामुळे शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच 9 जून रोजी एचए कॉलनी परिसरामध्ये एका महिलेवर दोघांकडून भरदिवसा गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये महिला बचावली. मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

18 दिवसांमध्ये सुमारे 32 वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. भोसरी येथे दोन वेळा वाहन तोडीफोडीच्या घटना घडल्या आहेत. 11 जून रोजी भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथील 16 वाहनांची तोडफोड करण्यात आली. 12 जून रोजी निगडी येथेही 8 ते 9 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि. 18) पुन्हा भोसरी येथील आदिनाथनगर येथे आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांकडून तोडफोड झालेल्या वाहनांची आकडेवारीही कमी दाखवली जात असली तरी प्रत्यक्षदर्शी नागरिकांमधून हे आकडे जास्त असल्याचे वर्तवले जात आहे. या घटनेबरोबरच खराळवाडी येथे एका मंदिरात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. 

याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनांसह सोनसाखळी चोरी, खंडणी, दुकानाची तोडफोड आदी घटनाही घडत असून  पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहेत. गुन्हेगारांवरही त्यांचा वचक नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.