होमपेज › Pune › पाण्याच्या विंधन यंत्राच्या इतिहासाला उजाळा

पाण्याच्या विंधन यंत्राच्या इतिहासाला उजाळा

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:09PMपुणे : प्रतिनिधी

राज्यासह देशात 1971 रोजी पडलेल्या भीषण दुष्काळात राज्यातील जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणार्‍या पहिल्या पाण्याच्या विंधन यंत्राचा (हॅल्को टायगर) इतिहास उजळला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या या यंत्राला राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास विभागाच्या प्रांगणात ठेवण्यात आले असून यंत्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या माहितीचा फलकही विभागाच्या वतीने लावण्यात आला आहे. 

याबाबत भूजल सर्वेक्षण व विकास विभागाचे संचालक शेखर गायकवाड म्हणाले, 1971 पुर्वी विहीरीपेक्षा थोडे खाली जमिनीखालचे पाणी काढण्यासाठी देशात कोणतेही तंत्र तसेच कोणतीही आधुनिक यंत्रसामुग्रीही नव्हती. तर, फक्त खाणीमध्ये मातीचा नमुना घेण्यासाठी विंधन यंत्राचा वापर होत होता. त्यानंतर, या विंधनयंत्रामध्ये बदल करत तिचा पाण्यासाठी वापर कसा करता येईल यादृष्टीने तिची रचना करण्यात आली. दरम्यान, भारतात 1971 रोजी दुष्काळ पडल्यानंतर युनिसेफच्या वतीने इंग्लड येथील हालीफॅक्स टूल कंपनीच्या सहा विंधण यंत्र (हॅल्को टायगर) देशाला भेटस्वरुपात देण्यात आले. त्यांपैकी उच्च क्षमतेचे, दणकट, स्वयंचलीत व वाहतुकीस सुलभ असे एक विंधन यंत्र महाराष्ट्र राज्याला उपलब्ध करून देण्यात आले. 115 मि. मि. व्यासाची व 85 मीटरपर्यंत खोल विंधण विहिर खोदण्याची क्षमता असणार्‍या या यंत्राने त्याकाळी राज्यात 1 हजारांहून अधिक बोअरवेल्स खोदल्या. तब्बल 22 वर्षे राज्यातील विविध ठिकाणी पाणी उपलब्ध करून ठेवणार्‍या या यंत्राने देशाच्या इतिहासात एक ओळख निर्माण केली आहे. 

दुष्काळ काळात डोंगराळ भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्राचा वापर अधिक झाला. त्याकाळात हे सर्वात वेगवान विंधणयंत्र होते. त्याचा सेटअप टाईम 10 मिनीटे असून त्याद्वारे कठीण खडकात, कमी वेळात प्रती ताशी 20 मीटर वेगाने अंतर्भेद केला जातो. तसेच तब्बल साडे तीन ते चार टन वजन असलेले हे विंधणयंत्र केवळ एकच माणूस हाताळू शकत होता. या यंत्राने भयानक दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील काही भागात विंधण विहिरीद्वारे भूगर्भातील पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन एक क्रांती निर्माण केली होती. यंत्राने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने ते स्मृती स्वरुपात त्याचे जतन केले असल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले.