Sat, Aug 24, 2019 21:42होमपेज › Pune › कचर्‍याचे ढीग म्हणजे स्मार्ट सिटी का? : अजित पवार 

कचर्‍याचे ढीग म्हणजे स्मार्ट सिटी का? : अजित पवार 

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:18AMपुणे ः प्रतिनिधी

मतदारांनी भारतीय जनता पक्षाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली आहे, मात्र जनतेची कामे मार्गी लागत नाहीत. पुणे महापालिकेत तर भाजपला पूर्ण बहुमत देऊनही पुणेकरांचे प्रश्‍न सुटत नाहीत. संपूर्ण शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग आणि कचर्‍याने ओसंडून वाहणार्‍या कचराकुंड्या दिसत आहेत. शहरभर कचर्‍याचे ढीग म्हणजे भाजपच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी का?, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांवर केली आहे. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या वार्तालापमध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. ते म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी फक्त पोकळ आश्‍वासनेच देण्याचे काम केले आहे. शहरातील सर्व आमदार, खासदार भाजपचे आहेत. तरी शहरातील कामे होत नाहीत. शहरातील चांदणी चौकातील उड्डाणपूल, शिवसृष्टी आणि जायका यासारखे प्रश्‍न सुटलेले नाहीत. मेट्रोचे काम म्हणावे तेवढ्या गतीने होत नाही. जिल्ह्यातील कामे होत नाहीत. भाजप-सेनेच्या शहरातील आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी कोणते काम मार्गी लावले, हे एकदा सांगावे. भाजपचे नगरसेवक तर पक्षाच्या रंगाचे बोर्ड लावण्यातच समाधान मानत आहेत. आम्ही सत्तेवर असताना कधी असे बोर्डांचे रंग बदलले नाहीत. बीडीपीची जागा शिवसृष्टीला देण्याची मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणा आहे.

जर ती जागा शिवसृष्टीला दिली आणि कोणी न्यायालयात गेले तर हे न्यायालयात टिकेल असे वाटत नाही. बीडीपीच्या जागेसंदर्भात वेगवेगळे धोरण न्यायालय मान्य करणार नाही. त्यामुळे हा मुद्दा आपण नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाची जास्त किंमत आहे. हा बेदबाव का केला जात आहे, हे कळत नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध घोषणा करून आणि जाहिरातबाजी करून भाजप पुन्हा मतदारांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करेल. पुण्याच्या जागेसंदर्भात सावध भूमिका विधानसभा, महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मताची संख्या जास्त असल्याने पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवणार, असे मी म्हटले होते. त्यावरून अनेकांनी जागा सोडणार नाही, असे गळे काढले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरणनिर्माण झाले.