होमपेज › Pune › गारपिटीचा सव्वा लाख हेक्टर क्षेत्राला तडाखा

गारपिटीचा सव्वा लाख हेक्टर क्षेत्राला तडाखा

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

विदर्भ-मराठवाड्यामध्ये शनिवार व रविवारी (दि. 10 व 11) झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे 11 जिल्ह्यांतील सुमारे सव्वा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण 1086 गावांतील पिकांना गारपिटीचा फटका बसला असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, या जिल्ह्यांतील एकूण पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज अगोदरच वर्तविला होता. नुकसानीचा आढावा घेण्याचे काम कृषी आयुक्‍तालयस्तरावरून सोमवारी सुरू होते. त्यामध्ये प्राप्‍त माहितीनुसार ही आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. काढणीच्या अवस्थेतील हरभर्‍याच्या घाट्यांची गळ झालेली आहे. तयार झालेल्या गव्हाचीही झड झालेली आहे. तर ज्वारीचे पीक भुईसपाट झाल्याचे चित्र काही ठिकाणी आढळून आलेले आहे. भाजीपाला पिके आणि फळबागांना गारपिटीचा मोठा तडाखा बसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामातील एकूण पिके आणि फळबागांच्या नुकसानीचा आकडा व क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाजही कृषी विभागातून वर्तविण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 32 हजार 700 हेक्टर, जालना जिल्ह्यात 32 हजार हेक्टर, अमरावती जिल्ह्यात 26 हजार 598 हेक्टर, तर बीडमध्ये 10 हजार 632 हेक्टरवर नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील तीन तालुके, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्‍ताईनगर, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगावराजा मिळून अकरा तालुके, अमरावती जिल्ह्यातील मोशी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुरजी, चिखलदरा, अकोला जिल्ह्यातील सात तालुके, वाशिममधील रिसोड व मालेगाव, लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुके, हिंगोलीमधील सेनगाव व औंढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला 

पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्याबाबत जिल्हानिहाय झालेल्या नुकसानीचे अंदाजित क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे ः कंसात गावांची संख्या नमूद केली आहे. बीड 10,632 (42), जालना 32,000 (175), परभणी 3,595 (23), जळगाव 2,495 (38), बुलडाणा 32,700 (286), अमरावती 26,598 (270), अकोला 4,360 (101), वाशीम 8,509 (36), लातूर 2,679 (59), उस्मानाबाद 583 (26), हिंगोली 143 (30) मिळून एकूण 1 लाख 24 हजार 294 हेक्टरवरील पिकांना गारपिटीने बाधा पोहोचून नुकसान झालेले आहे.