Mon, Apr 22, 2019 02:11होमपेज › Pune › देशी द्राक्षांना अमेरिकन बाजारपेठेची साद!

देशी द्राक्षांना अमेरिकन बाजारपेठेची साद!

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

युरोपसह आखाती देशांत स्थान मिळविलेल्या भारतीय द्राक्षांना आता अमेरिकेची बाजारपेठही खुणावू लागली आहे. चवीने गोड आणि उत्तम दर्जा असलेल्या भारतातील विविध द्राक्षांच्या आयातीमध्ये अमेरिकेने रस दाखविला असून, त्यांच्या देशाचे एक शिष्टमंडळ नुकतेच भारताच्या दौर्‍यावर येऊन गेले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून कीडनाशक उर्वरित अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) भारतीय द्राक्षांच्या आयातीस अमेरिकेचे दरवाजे खुले होण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण तथा ‘अपेडा’च्या पुढाकाराने अमेरिकेत द्राक्ष निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाचे एक शिष्टमंडळ 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत भारत दौर्‍यावर येऊन गेले. जोसे आर हर्नाडेझ, देवअलाह ए. मुरुवंदा, डोरोथी सी. वायसन, शेरॉन विल्यिम्स आदी कृषी अधिकार्‍यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. ‘अपेडा’च्या मुंबई येथील कार्यालयात पहिली बैठक झाल्यानंतर पुण्यातील मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (एनआरसी) येथील प्रयोगशाळांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. एनआरसीचे शास्त्रज्ञ डॉ. कौशिक बॅनर्जी व डॉ. सय्यद, कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी व निर्यात कक्षाचे प्रमुख गोविंद हांडे, उपसंचालक माणिक त्र्यंबके, ‘अपेडा’चे मुंबईतील अधिकारी प्रशांत वाघमारे, ओ. पी. वर्मा आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदी करण्यासाठी ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. त्यातून अशा बागांच्या नोंदी ग्रेपनेटवर केल्या जातात. निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून प्रबोधन करण्यात येते आणि कीडनाशक उर्वरित अंशमुक्त द्राक्ष निर्यातीची हमी आयाती देशांना दिली जाते. त्यापूर्वी आवश्यक त्या तपासण्याही केल्या जातात. अशीच निर्यातक्षम द्राक्षे युरोपियन बाजारपेठेसह अन्य देशांना भारतातून निर्यात होत असल्याचे शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत स्पष्ट करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या विविध द्राक्ष बागांनाही अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भेटी दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत, पालखेड-दिंडोरी येथील द्राक्ष बागांचा त्यात समावेश आहे. द्राक्षांचे पॅक हाऊस, मालाचे ग्रेडिंग, पॅकिंग, प्रिकूलिंग व कोल्ड स्टोअरेजबाबतच्या सुविधांचाही पाहणीत समावेश होता. द्राक्ष उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंत ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे कीडनाशक उर्वरित अंश अवलंबण्यास येत असलेल्या कामाबाबतची पाहणी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी केली आणि समाधानही व्यक्त केले.