होमपेज › Pune › दूध दर न देणार्‍या संघाचे अनुदान रोखणार : महादेव जानकर 

दूध दर न देणार्‍या संघाचे अनुदान रोखणार : जानकर 

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

दूधदर प्रश्नी शेतकर्‍यांशी चर्चा करण्याकरिता कायम माझी दारे खुली आहेत. चर्चेच्या माध्यमातून याबाबत तोडगा निघू शकतो. जे दूधसंघ शेतकर्‍यांना हमीभाव देणार नाही त्यांना यापुढील काळात दुधपावडरसाठीचे अनुदान देण्यात येणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे मत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्‍त केले. 

जानकर म्हणाले, दूधदराचा 27 रुपये हमीभाव मिळावा याकारणावरुन राज्यात शेतकरी आंदोलन करत असताना, त्यांच्या मताशी आम्ही सहमत असून किमान 25 रुपये तरी त्यांना भाव मिळाला पाहिजे दूधदर पडतील त्यावेळी शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी यादृष्टीने साखर फंड सारखाच ‘मिल्क फंड’ निर्माण करण्यात येणार असून दूधाचे दर पडतील त्यावेळी शेतकर्‍यांना त्यातून मदत केली जाईल.  

राज्यात मध्यंतरी लाळखुरकत लसीचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर विचार केला असता लस कंपनी अधिक दराने लस विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. अमूल, महानंदा या दुसर्‍या राज्यातील दूध कंपन्याची उत्पादनांवर राज्यात कायद्यानुसार बंदी घालता येणार नाही. लाळखुरकत लस तयार करणार्‍या बायोवेट, इंडियन इमोलॉजी या तीन कंपन्या इतके दिवस शासनाला ब्लॅकमेल करीत होत्या. त्यामुळे यापुढे लाळखुरकत लस शासना मार्फत स्वत:च तयार केली जाणार आहे.

राज्यशासनामार्फत 70 : 30 चे धोरण

लवकरच राज्यशासना मार्फत 70:30 प्रमाणाचे दूध धोरण कायदा आणला जार्इल त्यामाध्यमातून शेतकर्‍यांना मोठा फायदा मिळेल. राज्यात सध्याच्या मितीला संघटित क्षेत्रामार्फत दरदिवशी 105-115 लाख टन प्रति लिटर दूध उत्पादन होते. तर असंघटित क्षेत्रासह दरदिवशी दोन कोटी 86 लाख मेट्रीक टन दूध उत्पादन होत आहे. यंदाच्या वर्षी दूध उत्पादन मोठया प्रमाणात झाले असून राज्यात 26 हजार मेट्रिक टन दुध भुकटीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दुधभुकटी करणार्‍या 20 कंपन्यांनी ही अधिक भाव देण्यास टाळाटाळ केली आहे.

पुण्यात उद्या पशुपालक महामेळावा

रविवारी दि.20 मे रोजी पुण्यात पशुपालक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्‍त कांतीलाल उमाप यांनी दिली. ते म्हणाले, या महामेळाव्याचे आयोजन पशुसंवर्धन आयुक्‍तालयात करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, सामाजिकन्याय मंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.