Tue, Jan 22, 2019 20:07होमपेज › Pune › सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे : शरद पवार

सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे : शरद पवार

Published On: May 31 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 1:44AMभवानीनगर : वार्ताहर

कर्नाटकच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाला किमान पाच रुपये प्रतिलिटर अनुदान दिले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

कळस (ता. इंदापूर) येथील नेचर डिलाईट डेअरी व जयहिंद कॅटल फिल्ड प्रकल्पाला पवार यांनी बुधवारी (दि. 30) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी उद्योजक सदानंद सुळे, नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, श्री छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, सर्जेराव जामदार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनोद सपकळ, नानासाहेब निंबाळकर, मयूर जामदार, सुनील देसाई, डॉ. ज्योतीराम देसाई, शंकरराव देसाई, संदीप देसाई, केशव हेगडे, दीपक देसाई, अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. सिंग, मिलिंद कौलगी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सरकार म्हणत आहे जाहीर केल्याप्रमाणे दुधाला भाव दिला पाहिजे, परंतु सरकारने जाहीर  केलेल्या दूध दराप्रमाणे भाव देण्याची दूध संघांची कुवत नाही. कर्नाटक सरकारने दुधाला पाच रुपये प्रतिलिटर अनुदान दिले आहे. त्याप्रमाणे दुधाला पाच रुपये अनुदान मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. पूर्वी सरकार दुधाची खरेदी करत असे. आता सरकार दूध खरेदी करत नाही. सध्या दूध संघांनी दुधाचे पॅकिंग करून विकल्यास नुकसान कमी होईल.  

नेदरलँड व न्यूझीलंड हे दोन देश दूध उत्पादनात पुढे आहेत. नेदरलँडच्या मदतीने गाई, म्हशींचा दुधाचा काळ व क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 100 गीर गाई व 100 पंढरपुरी म्हशींच्या माध्यमातून ब्रिड सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दुधाची उत्पादकता वाढवून इतर खर्च कमी केले पाहिजेत. दुधाचा धंदा हा मोठ्या लोकांचा नसून तो सामान्य शेतकर्‍यांचा आहे.