होमपेज › Pune › शासनाच्या ‘संवाद वारी’ चित्ररथाने वेधले लक्ष

शासनाच्या ‘संवाद वारी’ चित्ररथाने वेधले लक्ष

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 09 2018 12:14AM



पुणे : प्रतिनिधी

वारीच्या पुण्यातील मुक्कामात नाना पेठेतील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा ‘संवाद वारी’ हा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून वारकरी आणि नागरिकांना देण्यात येत आहे. वारीच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कौटिल्य मल्टीक्रिएशन या निर्मिती संचाच्या 30 ते 35 कलाकारांतर्फे या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे.

वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे अवघा महाराष्ट्र वारीमय झाला आहे. यानिमित्ताने, ‘संवाद वारी’द्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना, उपक्रमांची माहिती या ‘संवाद वारी’तून दिली जात आहे. या उपक्रमात शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यांमध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अशा विविध योजनांच्या माहितीचा समावेश आहे.

पंढरपूर येथे आयोजित केल्या जाणार्‍या पाच दिवसांकरिताच्या प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवाद वारी’चे दालन असणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर या ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून झाला असून माहिती उपसंचालक मोहन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संग्राम इंगळे, जयंत कर्पे उपस्थित होते. शासनाची महसूल यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या सहकार्याने संवाद वारीचे आयोजन करण्यात आले आहे.