Wed, May 22, 2019 20:46होमपेज › Pune › 'डिलेव्हरी बॉय'च्या मित्राच्या घरातून ४५ सोन्याची बिस्किटे जप्त 

'डिलेव्हरी बॉय'च्या मित्राच्या घरातून ४५ सोन्याची बिस्किटे जप्त 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

मुंबई झवेरी बाजार येथून आणलेली चार किलो ९०० ग्रॅम  वजनाची सोन्याची बिस्किटे, मोबाईल आणि ६० हजार रुपये असा एकूण एक कोटी ३५ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज रिक्षातील चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चोरून नेल्याचा बनाव सराफ दुकानातील कामगाराने (डिलेव्हरी बॉय) केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. भाईंदर, मुंबई येथे मित्राकडे ठेवलेली 45 बिस्किट रात्रि दीडच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतली.

परिमंडळ तीनचे विशेष पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा तपास करुन तत्काळ २४ तासाच्या आत कामगाराचा डाव उघडकीस आणला. 
या प्रकरणी  कामगार बेहराम शांतिलाल पुरोहित  (३१, रा. टिंबर मार्केट, पुणे, मूळ- राजस्थान) याने फिर्याद दिली होती, तर तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद सरेमल चोप्रा यांचे पुण्यातील रविवार पेठेत समृद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चोप्रा यांच्याकडे पुरोहित हा ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करतो. तो मूळचा राजस्थानचा असून, टिंबर मार्केट येथे भाड्याच्या खोलीत भावासोबत राहतो.  

चोप्रा यांचा सोने-चांदीचा होलसेल व्यापार आहे. त्यामुळे पुरोहित, परिराम देवासी आणि मालक चोप्रा हे मुंबई येथील झवेरी मार्केटमधून वेगवेगळ्या दुकानांतून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करतात. दागिने घेऊन ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने पुण्यात येतात. नेहमी प्रमाणे बुधवारी सकाळी मालक चोप्रा यांनी पुरोहित याला मुंबईला सोन्याचे दागिने आणण्यासाठी पाठवले. पुरोहित हा रेल्वेने मुंबईला गेला  आणि त्याने झवेरी बाजारातून एक कोटी चाळीस लाख रुपये किमतीची चार किलो ९०० ग्रॅम वजनाची सोन्याची ४५ बिस्किटे घेतली.

सोन्याची बिस्किटे घेऊन तो खासगी वाहनाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बालेवाडी स्टेडियमसमोर उतरला. तेथून त्याला टिंबर मार्केटला जायचा असल्याने त्याने एका रिक्षा चालकास विचारले. रिक्षा चालकाने त्याला रिक्षात बसवले आणि कात्रजच्या दिशेने नेले. ‘इकडे कुठे घेऊन चालला,’ असे पुरोहित याने विचारले, असता रिक्षात पाठीमागे बसलेल्यांनी चाकूचा धाक दाखवून, ‘शांत बस नाही तर खल्लास करीन,’ अशी धमकी दिली. काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षा थांबवण्यास सांगितले. पुरोहित याला रिक्षातून खाली उतरवले आणि रिक्षा निघून गेले. त्या वेळी चोरट्यांनी जबरदस्तीने पुरोहित याचा मोबाईल आणि साठ हजार रुपये रोख रक्कम; तसेच ४५ सोन्याची बिस्किटे काढून घेऊन तेथून धूम ठोकली.

पुरोहित याने त्यानंतर अनेक वाहनांना लिफ्ट मागितली. त्या वेळी एका रिक्षा चालकाने त्याला लिफ्ट दिली. पुरोहित याने रिक्षा चालकाचा फोन घेऊन घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मालक चोप्रा यांना सांगितला. पुरोहित हा मध्यरात्री दोन वाजता घरी पोहचला. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास मालक आणि पुरोहित हे पोलिस ठाण्यात आले आणि तक्रार दिली, असा बनाव करत त्याने तक्रारीत सर्व नमूद केले होते. 

हिंजवडी पोलिस तसेच परिमंडळ तीनचे विशेष पोलिस पथकाने पुरोहित याच्याकडे कसून चौकशी सुरु केली. त्यावेळी तो गेली आठ वर्षांपासून समृद्धी ज्वेलर्समध्ये काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडून राजस्थानमध्ये व्यवसाय सुरू केला होता; मात्र व्यवसायात त्याला अपयश आले होते. त्याचा पत्नीसोबत घटस्फोटही झाला असल्याचे समोर आले. तसेच तो सांगत असलेली माहिती घटना यामध्ये तफावत आढळत होती. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केली. यातच गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा सगळा बनाव पुरोहित याने केला असल्याचा तपास लागला. गुन्हे शाखेचे पोलिस आणि परिमंडळ तीनचे विशेष पोलिस पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रात्री दिडच्या सुमारास भाईंदर येथे मित्राकडे ठेवलेले सोन्याची बिस्किट पोलिसांनी ताब्यात घेतली आणि पुण्याकडे प्रस्थान केले. या प्रकरणात तक्रार दिलेल्या पुरोहित याला अटक केली जाणार.

Tags : Pune, Pune News ,gold biscuits, stole,  worker


  •