Wed, Jul 17, 2019 20:10होमपेज › Pune › चिमुकलीचा बुडून मृत्यू

चिमुकलीचा बुडून मृत्यू

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:49AM

बुकमार्क करा
पुणे/ येरवडा : प्रतिनिधी 

आईसोबत पाणी आणण्यासाठी गेलेल्या सव्वादोन वर्षांच्या चिमुरडीचा वडगावशेरी येथील ब्रम्हा सनसिटी समोरील महापालिकेच्या विरंगुळा केंद्रातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.  

दशमी सुनील लोखंडे (रा.लेबर कॅम्प, वडगावशेरी, मूळ रा.दर्यापूर, अमरावती) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरीत ब्रम्हा सनसिटी या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. याठिकाणी काम करणारे मजूर उद्यानाच्या मागे असणार्‍या विरंगुळा केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला राहतात.  ठेकेदाराने महापालिकेची परवानगी न घेताच मजुरांना राहण्यासाठी कॅम्प तयार करून दिले आहेत.

याठिकाणी मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व सोयी-सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. चिमुकली आपल्या आईसोबत विरंगुळा केंद्रावर पाणी आणण्यासाठी गेली होती. जमिनीत असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन दशमीची आई कॅम्पकडे गेली. दशमी मागेच राहिल्याचे तिच्या लक्षात आले नाही. टाकीचे झाकण उघडे असल्याने दशमी वाकून बघण्यासाठी गेली असता ती टाकीत पडली. काही वेळाने  तिचा शोध कुटुंबीयांनी घेतला; मात्र दशमी सापडली नाही. दशमीचा टाकीत शोध घेतला. त्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली. लोखंडे कुटुंबीयांची दशमी ही एकुलती एक मुलगी होती.

पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंबीय अमरावतीवरून पुण्यात आले होते. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

ठेकेदाराने सुविधा पुरवल्याने नसल्याने घडली घटना

बांधकाम ठेकेदाराने मजुरांना कोणत्याही सुविधा पुरविल्या नसल्यामुळे मजुरांना पाणी भरण्यासाठी विरंगुळा केंद्रात जावे लागत होते. त्यामुळेच दशमीला जीव गमवावा लागला. याशिवाय या लेबर कॅम्पला महापालिकेची कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व घटनेस जबाबदार म्हणून ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनाधिकृत पत्र्याच्या शेडवर कारवाईची मागणी महापालिकेकडे केली असल्याचे नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले. विरंगुळा केंद्रावर महापालिकेचा सुरक्षा कर्मचारी काय करत होता असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.