Sat, Sep 22, 2018 19:15



होमपेज › Pune › मांजराचे पिलू नेण्यासाठी आलेल्या मुलीला सहा तास डांबले 

मांजराचे पिलू नेण्यासाठी आलेल्या मुलीला सहा तास डांबले 

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 12:50AM



पुणे : प्रतिनिधी 

मांजराचे पिलू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला तब्बल सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असे कृत्य करणार्‍या एकाला लोणी-काळभोर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

लक्ष्मण मरीबा भुरे (रा. उरुळी देवाची, ता. हवेली जि. पुणे, मूळ रा. चाकूर, ता. देगलूर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 8 वी इयत्तेत शिकणार्‍या 16 वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी मांजराचे पिलू आणण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला ओढून जबरदस्तीने घरात नेले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करताना तिने विरोध केल्यानंतर भुरे याने तिचे हातपाय ओढणीने बांधले. तसेच तिचे तोंडही बांधले. त्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी भुरेच्या घराचा दरवाजा वाजविल्यानंतर भुरेने पीडित मुलीला ओरडू नको, अशी धमकी दिली. परंतु, भुरेबद्दल संशय अधिक बळावल्याने दरवाजा उघडल्यानंतर भुरेने केलेला सर्व प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.