Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Pune › पुण्याचे प्रवेशद्वार होतेय कचर्‍याचे माहेरघर

पुण्याचे प्रवेशद्वार होतेय कचर्‍याचे माहेरघर

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 17 2018 12:03AMमुंढवा ः नितीन वाबळे

शहरामध्ये रोज सुमारे अठराशे टन इतका कचरा तयार होतो. त्यापैकी दीड हजार टन कचरा रामटेकडी येथे आणला जाणार आहे, तर कॅन्टोन्मेंट हद्दीमधील 40 ते 50 टन कचरा हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये आणला जात आहे. पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र, कॅन्टोन्मेंटचा कचरा डेपो, कॅन्टोन्मेंटचा गांडूळ खत प्रकल्प, रोकेम कचरा प्रकल्प, दिशा, नव्याने सुरू होत असलेला रामटेकडीमधील कचरा प्रकल्प अशी कचरा प्रकल्पांची मालिकाच हडपसर परिसरात सुरू झाली आहे. प्रत्येक प्रकल्पावर काय परिस्थिती आहे आणि त्याचा नागरिकांना काय त्रास होत आहे याचा दै.‘पुढारी’ने घेतलेला आढावा...

राष्ट्र सेवा दलाची भूमी, पुणे शहरासह मुंबईला भाजीपाला पुरविणारे ठिकाण अशी ओळख तसेच अलिकडील काळात मगरपट्टा सिटी व अमनोरा सिटीमुळे जगाच्या नकाशावर हडपसरचे नाव झळकत आहे. मात्र, आता वेगळ्याच नावाने म्हणजे शहरातील कचर्‍याचे माहेरघर म्हणून हडपसरचे नाव जगात झळकणार आहे की काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या हडपसरची ओळख पुसून कचराडेपोंची वसाहत अशी होतेय की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उरूळी देवाची-फुरसुंगी, रामटेकडी, हडपसर औद्योगीक वसाहत आदी परिसरात कचरा डेपो आणि प्रकल्प आहेत. रामटेकडी येथे नव्याने एक प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीपासून स्थानिक नागरिक व भाजप वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. मात्र, पालिका प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेता विरोधाकडे दुर्लक्ष करीत या प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले.

मागील अनेक वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणाहून गोळा केलेल्या कचर्‍याची ने-आण सोलापूर रस्त्याने होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याने कचरा प्रकल्पांना नागरिकांचा विरोध वाढत आहे. उरूळी देवाची व रामटेकडी येथील नारिकांना कचर्‍याचा होणारा त्रास आणि त्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने सर्वज्ञात आहेत. 

मागील पंचवीस वर्षांपासून उरूळी देवाची-फुरसुंगी येथे शहरातील कचरा आणून टाकला जात आहे. येथे कचरा टाकायला सुरवात केल्यानंतर दोन-तीन वर्षांच्या काळातच कचर्‍याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला. येथील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पालिका प्रशासनाला त्यापुढे झुकावे लागले व येथील कचरा रामटेकडी परिसरात आणण्याचे नियोजन सुरू झाले. 

रामटेकडी येथील नव्याने कचरा प्रकल्पाचे काम सुरू होताच भाजप वगळता स्थानिक नागरिक व सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, पालिका प्रशासनाने याची किंचीतही दखल घेतली नाही. त्यामुळे येथे रोकेमचा साडेसातशे टन व नव्याने होत असलेल्या कचरा प्रकल्पावर सातशे टन असा पूर्ण शहरातून सुमारे दीड हजार टन कचरा भविष्यात येथे येणार आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू झाल्यावर नागरिक काय भूमिका घेतात आणि प्रशासन त्याला काय उत्तर देते याविषयी नागरिकांमध्ये ऊलटसुलट चर्चा सुरू आहे.