Thu, Apr 25, 2019 11:42होमपेज › Pune › ‘पीएमपी’चे कामकाज नवीन आस्थापना आराखड्यानुसारच

‘पीएमपी’चे कामकाज नवीन आस्थापना आराखड्यानुसारच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाची स्थापना होऊन दहा वषार्र्ंचा काळ लोटला, तरी पीएमपीचा आस्थापना आराखडा तयार केला गेला नव्हता. व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर नवीन आस्थापना आराखडा तयार केला असून,त्यानुसारच कामकाज होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मुंढे यांनी नवीन आराखडा तयार करण्याबरोबरच बेकायदेशीर पदोन्नत्याही रद्द केल्या आहेत. त्यांना शैक्षणिक गुणवत्ता आणि पदापेक्षा तिप्पट वेतन दिले जात असल्याचे मुंढे यांच्या निदर्शनास आले होते. म्हणून 10 अधिकार्‍यांना मूळ पदावर काम करण्यास सांगितले आहे. पीएमपीचे पूर्वी तीन विभाग होते, आता ते चार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनावरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्वी कामाचे नियोजन व आराखडा नसल्याने खर्चाचा बोजा वाढला आहे. आता नवीन आराखड्यानुसारच काम चालेल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंढे म्हणाले, की प्रशासकीय कामकाजावरील सर्वसाधारण खर्च एकूण खर्चाच्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा शासकीय निर्णय आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये याकडे दुर्लक्ष झाल्याने गत आर्थिक वर्षात हा खर्च 50 टक्क्यांपेक्षाही पुढे गेला आहे. या अतिरिक्त प्रशासकीय खर्चामुळे पीएमपीचे कंबरडे मोडले आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी मुंढे यांनी नवीन आस्थापना आराखडा तयार केला असून, त्यानुसार कामकाजालाही सुरुवात केली आहे.

2009-10 या आर्थिक वर्षामध्ये पीएमपीकडे 10 हजार 236 कर्मचारी होते. त्यांच्या वेतनावर सुमारे 192 कोटी 25 लाख रुपये खर्च येत होता. हा खर्च एकूण खर्चाच्या 45 टक्के तर प्रतिसेवक प्रतिदिन 358 रुपये होता. 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 9 हजार 743 सेवकांसाठी 516 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा खर्च प्रतिदिन प्रतिसेवक 942 रुपये म्हणजे एकूण खर्चाच्या तब्बल 55.85 टक्के एवढा झाला आहे. हा खर्च शासकीय नियमांपेक्षा जास्त असल्यामुळे पीएमपीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.