Sat, Aug 17, 2019 16:45होमपेज › Pune › हडपसरमधील उड्डाणपूल ठरताहेत कुचकामी

हडपसरमधील उड्डाणपूल ठरताहेत कुचकामी

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:40AMमुंढवा : नितीन वाबळे

सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला ते कवडीपाट टोलनाका दरम्यान 10 किमी अंतरावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. रामटेकडी-वैदुवाडी, मगरपट्टा व हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल तात्पुरती मलमपट्टी ठरले आहेत. तुटपुंज्या बीआरटी मार्गामुळे वाहनचालकांची तारांबळ होत आहे. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर वर्ष, दोन वर्ष वाहतूक सुरळीत झाली. मात्र, नंतर वाढते नागरिकरण व वाहनांची संख्या यामुळे हे उड्डाणपूल कुचकामी ठरले आहेत. 

फातीमानगर परिसर हा शहरालगतचा आणि उच्चभ्रू लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. अलिकडच्या काळात या परिसराता मॉल्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकही खरेदीसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्याच्या बाजूलाच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतुकीसाठी रस्ता अपूर्ण पडत असल्याने बीआरटी मार्गावरील सायकल ट्रॅक व पदपथावरूनच दुचाकी व चारचाकी वाहने जात आहे. त्यामुळे भैरोबानाला ते कडवीपाट टोलनाक्यादरम्यान मास्टर उड्डाणपूलाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. 

मगरपट्टा चौकातून मुंढव्याकडे जाणा-या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मगरपट्टा चौकात टी आकाराचा उड्डानपुल चुकीचा झाला आहे. या उड्डानपुलावर मुंढव्याकडून वैदुवाडी चौकाकडे जाणारी वाहने आणि हडपसर गाडीतळाकडून मुंढव्याकडे जाणारी वाहने एकमेकांना क्रॉस होतात. त्यामुळे येथे अनेक वेळा अपघात झालेले आहेत. चुकीच्या उड्डानपुलामुळे दुचाकीला अपघात होऊनदुचाकीचालक पुलावरून खाली पडल्याच्या घडणा घडल्या आहेत. येथील उड्डाणपुलावरच वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार सातत्याने पाहवयास मिळत आहे.

गाडीतळ ते कवडीपाट टोलनाकादरम्यान दोन्ही बाजूचे पदपथ पथारी, हातगाडी व दुकानदारांनी व्यापले आहेत. मागील काहि महिण्यांपुर्वी रस्तारुंदीकरण करून दुभाजक बसविल्यामुळे काहि काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, वाढती अतिक्रमणे आणि वाहनांची संख्या यामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. मांजरी फाटा ( पंधरा नंबर ) चौकात सिग्नल बसविला असला तरी वाहतूक कोंडी सुटलेली नाही. लक्ष्मी कॉलनी आणि मांजरी उपबाजार, शेवाळेवाडी फाटा व टोलकाना दरम्यान दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. 

Tags : Pune, flyover, Hadapsar,  ineffective