होमपेज › Pune › गडकोटांचे हवाई दर्शन प्रथमच सामान्यांसाठी

गडकोटांचे हवाई दर्शन प्रथमच सामान्यांसाठी

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 11:57PMखडकवासला : वार्ताहर    

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनिय विद्वतेचा जिवंत वारसा  असलेल्या गडकोटांचे हवाई दर्शन माफक दरात शिवभक्त तसेच देशी विदेशी पर्यटकांना व्हावे यासाठी   राष्ट्रशक्ती  संघटनेच्या  वतीने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाच्या सुरूवातीला राज्यातील 148 पर्यटक तसेच स्थानिक मावळ्यांनी   हेलिकॉप्टर मधून सिंहगडाची  हवाई सफर केली. 

छत्रपती शिवरायांच्या जागतिक किर्तीच्या  व प्रखर राष्ट्रीय बाण्याची शिकवण देणार्‍या गडकोटांचे सर्वसामान्यांचे  हवाई दर्शनाचे  स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावे यासाठी राष्ट्रशक्तीचे अध्यक्ष माऊली दारवटकर या स्थानिक मावळ्याने अथक परिश्रम घेतले. ते  सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजणे येथील आहेत. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र कोंढणपूर येथील ऐतिहासिक तुकाईमाता मंदिरावर व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हेलिपॅडचे पूजन गणेश घुले यांच्या हस्ते करण्यात आले. ऐतिहासिक उपक्रमाचे पहिले पर्यटक होण्याचा मान डोणजे येथील  पुणे जिल्हा अपंग कल्याण समितीचे बाजीराव पारगे यांना मिळाला. अनेक पर्यटकांनी प्रथमच हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद घेतला. नरवीर तानाजी मालुसरे यांनी सर केलेला कडा, सिंहगडाच्या सभोवतालची गावे, वाड्या वस्त्या, गडावरील ऐतिहासिक वास्तू पहाताना सर्व जण आवाक झाले. 

कोंढणपूरचे  विश्वनाथ मुजुमले म्हणाले की, आजोबा, वडिलांच्या सोबत लहानपणापासून   सिंहगडाच्या पायर्‍या चढणार्‍या मावळ्याला  आकाशातून हा किल्ला पाहण्याचे भाग्य  मिळाले.  ज्येष्ठ नागरिक बापुसाहेब पलांडे म्हणाले, माझ्यासारख्या आळंदी-पंढरपूर करणार्‍या वारकर्‍यांचे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे व आकाशातून नरवीर तानाजी मालुसरे यांनी बलिदान देऊन पावन केलेला  सिंहगड पाहण्याचे स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केले.