Sun, Sep 23, 2018 14:07होमपेज › Pune › ससून रुग्णालयातील  सेवेचे शुल्क वाढले

ससून रुग्णालयातील  सेवेचे शुल्क वाढले

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 12:06AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने (डीएमईआर) राज्यातील 16 सरकारी वैद्यकीय रुग्णालयांतील उपचार देणारे सेवा शुल्क 20 ते 30  टक्क्यांपर्यंत वाढवलेले आहे. यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयाचाही समावेश असून त्यामुळे शासकीय रुग्णसेवा घेण्याचा खर्च वाढला आहे. 

राज्यात 16 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. ते राज्य सरकारद्वारे चालवले जातात. याआधी रुग्ण शुल्कामध्ये 8 वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली होती. पण सहा ते आठ वर्षांनी हे दर वाढवण्यात येत असल्याने डीएमईआरने शुल्कवाढ समितीची नेमणूक केली होती. या समितीने गेल्या काही महिन्यांत रुग्ण शुल्कांचा अभ्यास करून कोणत्या वैद्यकीय सेवांमध्ये किती शुल्क वाढवायचे याची माहिती शासनाला सादर केली. त्यानुसार ही शुल्कवाढ अस्तित्वात आली आहे.

यानुसार ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागापासून क्ष- किरण विभाग, शस्त्रक्रिया, तपासण्या, बेड चार्जेस आदी तपासण्यांचे प्रत्येक सेवेचे दर वाढविण्यात आलेले आहेत. एक लाखाच्या वरील उत्पन्न असलेल्या रुग्णांना हे दर लागू होणार आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत नवीन दर लागू होतील, अशी माहिती ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी दिली. 

सरकारी रुग्णालयांत सध्याचे दर अतिशय कमी आहेत. यामध्ये बाह्यरुग्ण विभागाचा दर हा 10 रुपये, एक्स रे 53 रूपये, सीटी स्कॅन 300 तर एमआरआय एक हजार आठशे इतके कमी आहेत. तसेच शस्त्रक्रिया व अ‍ॅडमिशन दरही अत्यंत कमी आहेत. त्यामध्ये वाढ होणार आहे.