Fri, Jan 18, 2019 02:45होमपेज › Pune › स्वाइन फ्लूची भीती झाली कमी

स्वाइन फ्लूची भीती झाली कमी

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. यामुळे स्वाइन फ्लू यावर्षी खूप कमी प्रमाणात रुग्ण आढळतील, अशी शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्‍त केली जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या स्वाइन फ्लू घटला असल्याने त्याची भीतीही समाप्त झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चारच महिन्यांत शहरात 249 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते व तब्बल 43 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यापैकी 14 रुग्ण हे महापालिका हद्दीतील, तर 29 रुग्ण हे पुणे ग्रामीण व इतर जिल्ह्यांतील रहिवासी; मात्र शहरात उपचारासाठी आले असताना त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत शहरातील 148 रुग्णांचा बळी गेला होता. 

यावर्षी मात्र जानेवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत केवळ 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, यापैकी 10 रुग्ण उपचार करून घरी गेले आहेत. एक रुग्ण उपचार घेत आहे. आजपर्यंत स्वाईन फ्लूने या वर्षात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही जवळपास 20 पटीने घटली आहे.ही बाब निश्‍चितच चांगली असून, स्वाइन फ्लूचा ज्वर घटण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सन 2009 पासून पुण्यात थैमान घातलेला स्वाइन फ्लू हा एका वर्षाआड कमी जास्त होत असल्याचे निरीक्षण आहे. एकावर्षी जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर दुसर्‍या वर्षी तो आपोआप कमी होत असल्याचेही आरोग्य अधिकारी सांगतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान दोन लाख 96 हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 हजार 742 संशयित रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आला आहे, तर त्यापैकी 492 रुग्णांचे घशातील स्त्राव तपाासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Tags : Pune, fear, swine flu, decreased