Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Pune › निष्ठावंतांना वार्‍यावर सोडणार नाही

निष्ठावंतांना वार्‍यावर सोडणार नाही

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:19PMपिंपरी : प्रतिनिधी

पालिकेवर कमळ फुलविण्यात जसा नवीन पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा वाटा आहे, त्याप्रमाणे जुन्या आणि निष्ठावंताचाही तेवढाच हात आहे. भविष्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना न डावलता त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्यात येईल, तुमच्यावर अन्याय होणार नाही,  याची ग्वाही मी देतो. भविष्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांनी एका दिलाने काम करा, शहरातील दोन्ही आमदारांबरोबर चर्चा करून नवीन -जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून काम करू या,  असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

लोणावळा येथे गुरुवारी (दि.10) पार पडलेल्या पिंपरी-चिंचवडमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. अमर साबळे, आ. बाळा भेगडे, प्रदेश चिटणीस उमा खापरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक केशव घोळवे, संदीप कस्पटे, माउली थोरात, अ‍ॅड. मोरेश्‍वर शेडगे, बाळासाहेब मोळक, शेखर लांडगे, अजय पाताडे, संतोष तापकीर, पोपट हजारे, दत्तात्रय तापकीर, माऊली गायकवाड, दिलीप गोसावी, राजू वायसे, संतोष घुले आदी उपस्थित होते.

अन्यायाबाबत पाढा वाचताना कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले होते. पालिकेवर कमळ फुलविण्यासाठी दोन आमदार, एक खासदार यांच्याबरोबरच आमच्या प्रयत्नामुळे ते शक्य झाले आहे. अच्छे दिन येतील असे वाटत असतानाच ‘नवीन घरामध्ये आणि जुने कार्यकर्ते घराबाहेर’ अशी वेळ आमच्यावर आली.त्यामुळे आम्हाला हक्कासाठी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. आम्ही उपोषण केले त्याबद्दल क्षमस्व; परंतु साहेब निवडणुकीच्या काळात अनेक जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली. त्यावेळी आम्ही पक्षासाठी गप्प बसलो. सत्ता आल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळेल असे वाटत होते; मात्र तसे न होता सर्व नियम धाब्यावर बसवून  स्वीकृत सदस्य निवडीत आम्हाला डावलून निवडणूक लढविलेले, पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेल्यांबरोबरच कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणार्‍यांना संधी देण्यात आल्यामुळे 
आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी दानवेंना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

‘पक्षसमर्थक नव्हे स्वसमर्थक’

सध्या पक्षात पक्षसमर्थक ऐवजी स्वसमर्थक वाढविले गेले आहेत. नव्यांच्या या धोरणामुळे जुने आणि निष्ठावंत हतबल झाले आहेत. ‘तुम्ही फक्त पक्षाची कामे करायलाच आहात’ असे आम्हाला नव्यांकडून हिनवले जात आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी असाच अन्याय सहन करायचा का? का, आम्ही घरात बसायचे असा सवाल खा. दानवे यांना कार्यकर्त्यांनी केला.