होमपेज › Pune › शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यात पालिकेस अपयश

शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यात पालिकेस अपयश

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 12:27AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात; मात्र शहरातील मैला सांडपाणी तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक रासायनिक सांडपाणी थेट नद्यांत मिसळत असल्याने त्या अतिदूषित होत आहेत; तसेच नदीपात्रांना जलपर्णीचा विळखा पडला आहे. त्यामुळे जलचरांसह नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे प्रदूषण रोखण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

शहरातून 24 किलोमीटर अंतर पवना नदी वाहते. नदीत अमृतानंद मठाजवळ, आकुर्डीतील मयूर समृद्धी सोसायटी, भोसरीतील स्टर्लिंग स्कूल, श्री स्वामी समर्थ बसथांबा, सीएमई कुंपण, लांडेवाडी, सॅण्डविक कंपनीमागे, फुगेवाडी स्मशानभूमी, मामुर्डी, सिम्बॉयोसिस महाविद्यालयासमोर, लेखा फॉर्म, विकासनगर-मामुर्डी, मोरवाडी, एम्पायर इस्टेट, भाटनगर झोपडपट्टी, भाटनगर एसटीपी, बौध्दनगर झोपडपट्टी, मोहननगर, लोकमान्य रुग्णालय, बजाज हायस्कूल, नक्षत्र हॉटेल, एसकेएफ-चिंचवड आदी 21 नाले मिसळतात. त्यातील विकानगर व मोहननगर हे दोन नाले सर्वांधिक दूषित असल्याचे प्रदूषण मंडळाच्या चाचणीत आढळून आले आहे. तर, पिंपरी गाव नवीन पुल व दापोडीतील हॅरिस पुल हे सर्वांधिक प्रदुषित पाण्याची ठिकाणे आहेत. 

सोळा किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी शहरातून वाहते. नदी काठावर देहू व आळंदी ही दोन तीर्थक्षेत्र आहेत. नदीत तळवडे बंधारा, दत्तमंदिर-चाकण पूल, चिखली, नेवाळेवस्ती, तळवडे स्मशानभूमी इ. नाल्यातील सांडपाणी मिसळते. त्यातील नेवाळेवस्ती व चिखली नाला सर्वांधिक दूषित असल्याचे प्रदूषण मंडळाचा अहवाल आहे. तर, सर्वांधिक प्रदुषित पाण्याची ठिकाणे तळवडे व सस्तेवस्तीतील कडजाई मंदिर येथील आहेत. पुणे शहराला लागून केवळ 4 किलोमीटर अंतर मुळा नदी शहरातून वाहते. बोपखेलमधील टाटा कम्युनिकेशन टॅन्गो गेट,  सीएमई, रामनगर-बोपखेल हे तीन मोठे नाले नदीत मिसळतात. त्यातील सीएमई व टॅन्गो गेट हे दोन नाले सर्वाधिक प्रदूषित आहेत. तर, पिंपळे निलख व वाकड बंधारा येथील पाणी सर्वांधिक दूषित असल्याचे अहवाल आहे. 

नद्यांत शहरातील मैला सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते, अशा नगरसेवकांसह पर्यावरणप्रेमींची तक्रारी आहेत; तसेच औद्योगिक पटट्यातील रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यावरून पालिकेस प्रदूषण मंडळाने वेळोवेळी नोटीसाही बजावल्या आहेत; तसेच  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. या जलप्रदूषणामुळे पाण्यातील जलचरास आवश्यक असलेला ऑक्सिजन (डीओ) कमी झाला आहे. हे चित्र अति प्रदूषित पाण्याचा ठिकाणी आहे; तसेच जैविक ऑक्सिजनचा पुरवठा (बीओडी) आणि रासायनिक ऑक्सिजनचा पुरवठ्याचे (सीओडी) प्रमाण घटत आहे. त्यांचा दुष्परिणाम जलचरांवर होत आहे. परिणामी, दूषित पाण्यात जलपर्णी फोफावत आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.