Thu, Apr 25, 2019 23:39होमपेज › Pune › प्रायोगिक तत्त्वावरील ई-बस महिनाअखेर धावणार

प्रायोगिक तत्त्वावरील ई-बस महिनाअखेर धावणार

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावरील  ई-बस ऑगस्टअखेर धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वारगेट ते कात्रज दरम्यान ई-बस धावण्यासाठी चाजिर्र्ंग सेंटर बसचा मार्ग,प्रकल्पाचे पीएमपीएमएल कार्यालयात सादरीकरण करण्यात आले आहे. या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी, सीआयआरटी संस्था अधिकारी यांच्यासह पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे उपस्थित होत्या.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात असलेल्या बहुतांश बसेस डिझेलवर धावत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्यामुळे पीएमपीएमएल महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच इंधन ज्वलनामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ई-बसेसची खरेदी करण्याचा निर्णय पुणे स्मार्ट सिटी प्रशासनाने घेतला होता.

त्यानुसार ई-बसचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सीआयआरटी संस्थेने पूर्ण केले आहे.  त्या पार्श्‍वभूमीवर पीएमपीएमएल कार्यालयात प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार ई-बस चार्जिंग करण्यासाठी आवश्यक ठिकाण, बसचा मार्ग, प्रवाशांची संख्या, भाडे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार ऑगस्ट महिनाअखेर प्रवाशांच्या दिमतीला पहिली ई-बस उपलब्ध होणार आहे. 

500 वातानुकूलित ई-बस खरेदीस परवानगी

पीएमपीएमएल संचालक महामंडळाने 500 वातानुकूलित ई-बससह 100 सीएनजी गॅसवर चालणार्‍या बसची खरेदी करण्यास निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ई-बस निविदा काढून खरेदीचा मार्ग अल्पावधीतच मोकळा होणार आहे.