Mon, Jul 22, 2019 04:29होमपेज › Pune › बेलवाडीत गोल रिंगण उत्साहात

बेलवाडीत गोल रिंगण उत्साहात

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:05AMभवानीनगर/वालचंदनगर : रियाज सय्यद/धनंजय थोरात

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात अश्वाने जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे पार पडले. सणसर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने रविवारी (दि. 15) सकाळी सहावाजता निमगाव मुक्कामाकडे प्रस्थान केले.

दरम्यान, जाचकवस्ती येथे वारकर्‍यांना अल्पोपाहार वाटप करण्यात आला. बेलवाडी बस स्थानकावर ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले आणि सकाळी साडेसात वाजता पालखी सोहळा रिंगण स्थळावर विसावला.  ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात प्रथम भगव्या पताकाधारी वारकर्‍यांनी पालखीला प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, विणेकर्‍यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखीच्या मानाच्या अश्वाचे व मोहिते पाटील यांच्या अश्वाचे रिंगण झाले. 

या अश्वांनी पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण केली.  दरम्यान, आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे सभापती करण घोलप, नेचर डिलाईट दूध संघाचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतीलाल जामदार, शहाजी शिंदे, सरपंच माणिक जामदार, श्री छत्रपती कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, सचिन सपकळ, अनिल पवार, मयूर जामदार, विठ्ठल पवार, सचिन भिसे, अनिल कदम, राहुल काळे, विजय काळे, दादा गायकवाड,  संजय मुळीक, विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, ग्रामविकास अधिकारी ए. जी. सय्यद आदी उपस्थित होते.

रिंगण सोहळा पार पडल्यानंतर येथील मारुती मंदिरामध्ये पालखी ठेवण्यात आली. सकाळच्या न्याहरीसाठी पालखी सोहळा बेलवाडीत विसावला होता. सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा निमगाव मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालखी रिंगण स्थळावर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लासुर्णे येथे पापाभाई मुलाणी, वलीखान मुलाणी,  शहानुर मुलाणी, इरफान मुलाणी, लतिफ मुलाणी, फिरोज सय्यद यांनी तीन हजार वारकर्‍यांना झुणका-भाकरीचे वाटप केले. तसेच देसाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. माहिती डॉ. ज्योतीराम देसाई यांनी दिली. नेचर डिलाईट दूध संघातर्फे दहा हजार दूध पुडे व बिस्कीटवाटप केल्याची माहिती सुनील देसाई यांनी दिली.