Thu, Apr 25, 2019 05:53होमपेज › Pune › तरूणाईच्या उर्जेतून राष्ट्र उभारणीस दिशा मिळेल

तरूणाईच्या उर्जेतून राष्ट्र उभारणीस दिशा मिळेल

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

देशातील तरुणाईचा ओढा भारतीय जनता पक्षाकडे असून या प्रवाहात वरचेवर वाढच होत असल्याचे संवाद यात्रेतून मला दिसून आले आहे. भाजपकडून तरुणाईची रोजगार आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तरूणाईची ही अपेक्षा पूर्ण करण्यास भाजप कटिबद्ध आहे.तसेच तरुणाईच्या उर्जेतून राष्ट्रउभारणीस दिशा मिळेल, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले. 

खा. महाजन यांच्या पश्‍चिम महाराष्ट्रीय ‘युवा संवाद यात्रे’चा समारोप शनिवारी पुण्यात झाला. यानिमित्ताने खा. महाजन यांनी दैनिक पुढारी, पुणे कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. खा. महाजन यांचे पुढारी परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भाजयुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्‍वर देसाई, प्रवीण वटके, लीगल सेलच्या प्रमुख चारु प्रज्ञा, राज्य प्रभारी अतुल कुमार, सहप्रभारी अलोक डंगस, भाजयुचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यावेळी उपस्थित होते.

खा. महाजन म्हणाल्या, सध्या भाजयुला संघर्ष आणि गर्दी करण्यासाठी युवकांची गरज नाही. त्यांतील उर्जेचा वापर   राष्ट्र उभारणीसाठी करायचा आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक गोष्टी मला स्वतःला शिकता आल्या आहेत. यात्रेदरम्यान कोठेही नागरिकांमध्ये आणि युवकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविषयी किंवा भाजपविषयी नाराजी दिसली नाही. उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेदरम्यान पंजाब नॉशनल बँकेतील आर्थिक घोटाळ्यावर कोणी एक शब्दही विचारला नाही, त्यामुळे भविष्यात नीरव मोदी प्रकरणाचा भाजपवर कोणता परिणाम होणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. देशातील 2014 नंतरच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या, सध्या देशात डावा विचार आणि प्रचार कमी झालेला आहे. त्यामुळे आम्हाला त्रिपुरामध्येही अनुकूल वातावरण आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना उद्योजक होण्याचे आवाहन केले आहे. त्यादृष्टीने युवकांची ताकद योग्य दिशेने घेऊन जाण्याचे आणि त्यांना उद्योजकतेच्या वाटेवर आणण्याचे काम भाजयुच्या माध्यमातून आम्ही करू, असेही खा. महाजन म्हणाल्या.