Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Pune › अवेळीच्या पावसामुळे उत्पादनात घट

द्राक्ष निर्यातीत १६ हजार टन घट

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

देशातून चालूवर्षीच्या हंगाम 2017-18 मध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 16 हजार टनांनी द्राक्ष निर्यातीत घट आलेली आहे. द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे. राज्यात झालेल्या अवेळीच्या पावसाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसल्याचे सद्य:स्थितीवरुन दिसून येत आहे. मालाची प्रत खालावल्यामुळे निर्यात कमी झाल्याची माहिती कृषि आयुक्तालयातून देण्यात आली.

देशातून हंगाम 2016-17 मध्ये एकूण दोन हजार कोटी रुपयांची सुमारे 1 लाख 8 हजार टनाइतकी द्राक्ष निर्यात परदेशात झाली होती. ती चालूवर्षीच्या हंगामात म्हणजे 2017-18 मध्ये सद्यस्थितीत 92 हजार 286 टनाइतकीच झाल्याची माहिती कृषि आयुक्तालयातील निर्यात कक्षाचे प्रमुख आणि तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली. या बाबत ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, देशात द्राक्ष पिकाखाली महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र असून निर्यातीत मोठा वाटा आहे. सुमारे 1 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा फोफावलेल्या आहेत.  मात्र, उत्पादनात घट येऊनही द्राक्ष निर्यात तुलनेने चांगली झाली आहे.

महाराष्ट्रातून 92 हजार 178 टन तर कर्नाटकातून 107 टन द्राक्षांची निर्यात पूर्ण झाली. द्राक्ष निर्यातीसाठी शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेकडून ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यावर द्राक्ष बागांच्या नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. राज्यातून एकूण 34 हजार 714, कर्नाटकातून 72 आणि आंध्रप्रदेशातून 70 बागांची मिळून एकूण 34 हजार 856 बागा नोंद करण्यात आली आहे.

मात्र, प्रत्यक्ष निर्यातीत आंध्रप्रदेशचा वाटा शून्यच असल्याचे त्यांनी सांगितले. नेदरलँण्डला 3691 कंटनेरमधून 49 हजार 25 टन, जर्मनीला 1272 कंटेनरमधून 16 हजार 407 टन, इंग्लंडला 1221 कंटनेरमधून 15 हजार 535 कंटेनरइतकी सर्वाधिक निर्यात झालेली आहे. याशिवाय डेन्मार्क, बेल्जियम, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, पोलंड, ग्रीस आदींसह अन्य देशांनाही भारतातून द्राक्ष निर्यात झालेली आहे.