होमपेज › Pune › घामाघूम चालकांना ना पंखा, ना पाणी

घामाघूम चालकांना ना पंखा, ना पाणी

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:10AMपुणे : निमिष गोखले

मनमाड-शिवाजीनगर मार्गावर धावणारी एसटी दुपारी 3 वाजता आगारात दाखल झाल्यानंतर ती पार्क करून चालक अमोल शिवदे (नाव बदलले आहे) शिवाजीनगर आगारातील विश्रामगृहात गेला. 40 अंश सेल्सिअस तापमानातून विश्रामगृहात शिरल्यानंतर निदान पंखा, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा त्याला मिळाव्यात अशी त्याची किमानपक्षी अपेक्षा असते. मात्र ती देखील पूर्ण होताना दिसत नसून घामाघूम होतच तेथील विश्रामगृहात तो एका साध्या सतरंजीवर पहुडल्याचे चित्र दिसते. गादीतर सोडाच पण कुबट वास येणारी सतरंजी त्यांच्या नशिबी असून फरशीवर अस्वस्छतेचे साम्राज्य, अशा वातावरणात तो विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतो. कित्येक तास एसटीवर कामगिरी बजावल्यानंतर तास-दीड तास आराम करावे,अशी अमोलसह सर्वच चालकांची अपेक्षा असते. मात्र विश्रामगृह एसटी कर्मचार्‍यांसाठी सजा ठरत असल्याचे धक्कादायक चित्र पाहणीतून दिसून आले. 

शिवाजीनगर विश्रामगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून कर्मचार्‍यांसाठी कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. येथे साधा नळ जोड नसून पिण्याचे पाणी भरण्यास कर्मचार्‍यांना बाहेर जावे लागते. एसटी कार्यशाळेच्या येथे एक नळ जोड असून तेथे जाऊन बाटलीत पाणी भरावे लागते. परंतु, बहुतांश वेळा ते देखील अशुद्ध असून कर्मचार्‍यांचा आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अनेक कर्मचारी आजारी पडू लागल्याचे दिसते. मध्यरात्री पाणी हवे असल्यास ते मिळत नसून पाण्याअभावी कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. अनेक कर्मचारी मिनरल वॉटर विकत घेत असून एसटी प्रशासनाची कर्मचार्‍यांप्रती असणारी काळजी या निमित्ताने समोर येत आहे. शिवाजीनगर विश्रामगृहात पुणे, मनमाड, पिंपळगाव, नाशिक, मालेगाव, सटाणा, नगर आगारातील सुमारे तीनशे चालक-वाहक वास्तव्य करतात. 

विश्रामगृहात दहा पंखे आहेत. मात्र सर्व पंखे जुने झाले असून पंखा फुल्ल ठेवला तरीदेेखील तो हळूच फिरत असल्याने कर्मचार्‍यांना वारा लागतच नाही. विश्रामगृहाची साफसफाई करण्यास खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु स्वच्छता दररोज होत नसल्याने फरशीवर केर-कचरा साठला आहे. भिंतींना दहाच दिवसांपूर्वी नवा रंग देण्यात आला आहे. मात्र त्याचा दर्जा निकृष्ठ असून आताच ओल आल्याचे दिसते. स्वारगेट विश्रामगृहाची अवस्था थोड्याफार फरकाने तशीच असून तेथे शिरल्या-शिरल्या नाक मुठीत धरूनच जावे लागते. संपूर्ण विश्रामगृहात केर-कचरा साठला असून तो उचलण्यास स्वच्छता विभागातर्फे गेले महिनाभर कोणीही फिरकलेले नाही, असा दावा येथील कर्मचार्‍यांनी केला आहे. येथील खिडक्या तुटल्या असून यामुळे डास चावल्यामुळे कर्मचारी हैराण होत आहेत. स्वच्छतागृह तरी कसे म्हणावे असा प्रश्‍न पडत असून बहुतांश ठिकाणी दारेच नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचार्‍यांना संकोचल्यासारखे होत आहे. एकंदरीतच विश्रामगृहाची अवस्था असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली आहे.