होमपेज › Pune › चालकानेच केला मालकाच्या अपहरणाचा कट

चालकानेच केला मालकाच्या अपहरणाचा कट

Published On: Jun 09 2018 1:51AM | Last Updated: Jun 09 2018 1:44AMपुणे ः प्रतिनिधी 

विश्‍वासू चालकाने मालकाच्या अपहरणाचा कट रचत त्याच्याकडून तब्बल 14 लाख 30 हजार रुपये उकळल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. बीटी कवडे रस्त्यावर कार अडवून पिस्तुलाच्या धाकाने एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मॅनेजरचे अपहरण करून तब्बल 14 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाचने पाच खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विजय श्रीहरी नवघणे (वय 26, रा.  खामगाव मावळ, ता. हवेली), प्रदीप चंद्रकांत वाघ (वय 30, रा. सांबरेवाडी, खानापूर), उत्तम मारुती भामे (वय 28), गौतम वसंत कांबळे (वय 32), विशाल कैलास शेलार (वय 34, तिघेही रा. गोर्‍हे खुर्द, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून सहा लाख 92 हजार रुपये जप्त केले. त्यांनी हे उकळलेले पैसे मौजमजेसाठी उडविल्याचे समोर आलेे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहा. आयुक्त भानुप्रताप बर्गे व निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मनोहर कटकमवार (वय 37, रा. सिंहगड रोड) हे  एका कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर आहेत. ते 22 मे रोजी सायंकाळी ते त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. त्यावेळी कवडे रोडवरील सोपान बाग येथे दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावून थांबविले. त्यांनी जबरदस्तीने कारमध्ये घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून कारचा ताबा घेतला. त्यांना नाना पेठ, सेव्हन लव्हज चौक असे फिरवून कात्रज घाटात घेऊन गेले. कटकमवार यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितली. त्यानंतर  नातेवाईक, मित्रांना फोन करायला लावून, वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे जमा करायला लावले. हे पैसे स्वतः चालक नवघणे घेऊन आला. कटकमवार यांच्याकडून तब्बल 14 लाख 30 हजार रुपये उकळल्यानंतर त्यांना 23 मे रोजी पहाटे त्यांना बावधन येथे सोडून दिले. त्यावेळी कटकमवार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

या गुन्ह्याचा युनिट पाचकडून तपास सुरू होता. पोलिस कर्मचारी भरत रणसिंग व महेश जाधव यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या पाच जणांस अटक केली. त्यावेळी कटकमवार यांचा चालक नवघणे याच्या सांगण्यावरूनच हा कट रचल्याचे समोर आले. तसेच, खंडणी उकळल्यानंतरही कटकमवार हे तक्रार करणार नाहीत. भरपूर पैसे मिळतील, असे सगितले होते. या गुन्ह्यात त्यांनी बनावट पिस्तूल वापरले असल्याचे बर्गे यांनी सांगितले.