Wed, Jul 17, 2019 10:07होमपेज › Pune › पिण्याच्या पाण्याचे केंद्राकडून होणार ऑडीट

पिण्याच्या पाण्याचे केंद्राकडून होणार ऑडीट

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेकडून नागरिकांना केल्या जाणार्‍या पिण्याच्या पाण्याचे भारतीय लेखा परिक्षण विभागाकडून परिक्षण (ऑडीट) होणार आहे. पहिल्यांदाच अशा पध्दतीचे ऑडीट होत आहे. त्यात प्रामुख्याने पिण्याची पाण्याची गुणव्वता, संख्या आणि वाटप यंत्रणा याचा समावेश असून या ऑडीटमध्ये आढळून येणार्‍या त्रुटी दुर करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून महापालिकांना मदत मिळणार आहे.

राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या आणि महत्वाच्या मानल्या जाणार्‍या नऊ महापालिकांमधील पिण्याच्या पाण्याचे ऑडीट करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या लेखा परिक्षण आणि लेखा विभागाने घेतला आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक या प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकेच्या अधिकार्‍यांची मुंबईत या लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.

त्यात या महापालिकांकडून शहराची लोकसंख्या, होणारा पाणी पुरवठा, त्याचे स्त्रोत, त्यावरील खर्च आदी बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. त्या माहितीच्या आधारे आता पाण्याचे ऑडीट होणार आहे. त्यासाठी आठ वेगवेगळे निक्ष ठरविण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाणी पुरवठ्यावर किती खर्च केला जातो, त्यातून पालिकेला मिळणारे उत्पन्न, पाण्याबाबत येणार्‍या तक्रारी आणि त्यांचे होणारे निवारण,त्याचबरोबर शहराची लोकसंख्या आणि एकूण होणारा पाणी पुरवठा यासंबधीचे ऑडीट होणार आहे. त्यातून महापालिकेकडून केल्या जाणार्‍या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यासंबधीचा अहवाल आल्यानंतर पाणी पुरवठयामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे, त्याची काय उपाय योजना करता येईल हे स्पष्ट होणार आहे. तसेच त्यासाठी केंद्राकडून निधी उभारण्यास अर्थसहाय होऊ शकणार आहे.