Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Pune › डॉक्टरच्या निष्काळजीने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

डॉक्टरच्या निष्काळजीने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी

सोळा वर्षाच्या मुलीवर डॉक्टरने गैरहजर राहून स्टाफद्वारे उपचार करत हलगर्जीपणा केला. तसेच तिला पुढील उपचारासाठी लवकर ‘रेफर’ न केल्याने मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात डॉक्टर नवनाथ नगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डॉ. नगरेला अटक केली असून न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी मुलीचे वडील कालीदास बाबर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार डॉ. नगरे यांच्यावर भादवि 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट 1961 च्या कलम 33 नुसार 18 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती कालीदास बाबर (वय 16, रा. कोंढवे धावडे) हिला घसा दुखणे, उलटीचा त्रास होत असल्याने तिला 23 मे रोजी रात्री उत्तमनगर येथील नगरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तिला अ‍ॅडमिट करावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला दुस-या दिवशी 24 मे रोजी कानाची तपासणी करण्यासाठी शाश्‍वत हॉस्पिटल येथे पाठवले. यानंतर तिला परत दुपारी अडीच वाजता नगरे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले व डॉक्टर नगरेंना फोनवर विचारून तिच्या नातेवाईकांनी आदितीला जेवण दिले. 

जेवणानंतर तिच्या पोटात एका तासाने वेदना होऊ लागल्या. यावेळी तेथील डॉक्टरांनी डॉ. नगरे यांना फोन करून दिलेल्या सूचनानुसार उपचार दिले. पण यामध्ये तिचा मृत्यू झाला. दरम्यान तिला माई मंगेशकर रुग्णालयात पाठविण्यात आले असता तिला तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण  डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी हे प्रकरण पोलिसांद्वारे ससूनच्या मेडिकल बोर्डकडे पाठवले.

ससूनच्या मेडिकल बोर्डने डॉ. नगरे यांनी उपचारादरम्यान ‘प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड  मेडिकल निग्लिजन्स’ केला असल्याचा अभिप्राय दिला. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचाराच्या वेळी गैरहजर राहणे आणि डॉक्टर होमिओपॅथी असून त्यांनी अ‍ॅलॉपॅथीच्या उपचारांची तत्काळ गरज असताना पुढील रुग्णालयात पाठविले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डी. एम. कोल्हे यांनी दिली.