Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Pune › दुभाजक केवळ नावापुरतेच

दुभाजक केवळ नावापुरतेच

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी

रहदारीच्या रस्त्यावर वाहनांचे अपघात टाळण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी लावण्यात आलेल्या शहरातील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या अवस्थेतील या दुभाजकांमुळे वाहनचालक बेशिस्त झाले असून यामुळे अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी यांसह शहरातील विविध भागातील दुभाजकांची अवस्था बघवेनाशी झाली आहे. या दुभाजकांचा मुळ उद्देशच नाहीसा झाला असून यामुळे शहरातील विविध भागातील वाहतूक बेशिस्त झाली आहे. पिंपरी चिंचवड लिंकरोड परिसरात तर नागरिक तसेच वाहनचालक तुटलेल्या दुभाजकांमधून रिक्षा तसेच दुचाकी दामटवत असून यामुळे अऩेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. नव्याने होत असलेल्या उड्डाणपूलाखालील दुभाजक नागरिकांनी स्वतच्या सोयीनुसार तोडले असून येेथे रिक्षाचालक तसेच नागरिकही धोकेदायक पध्दतीने या दुभाजकाचा वापर करत आहेत. 

अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले असून काही दुभाजक तुटून रस्त्यावर पडतील अशा अवस्थेत आहेत. काही ठिकाणी दुभाजकांवर झाडेच लावण्यात आली नाहीत. तर काही ठिकाणी झाडे वाढली आहेत. त्यामुळे या झाडांमुळे वाहनधारकांना पलिकडच्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. दुभाजकांवर वाढलेल्या या झाडांचा वापर  आता  सर्रास कपड़े वाळवण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेची स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल सुरु असून शहरातील दुभाजक मात्र केवळ नावालाच उरले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

मागील  काही दिवसांपासून या मार्गावर रात्रीच्या वेळेस वारंवार छोटया मोठ्या अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. परंतु, तरीही पालिका, वाहतूक पोलिसांकडून याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी शहरात दुभाजकांमुळे अनेक अपघात झाले आहेत. शहरात नवीन येणार्‍या वाहनधारकांना याची कल्पना नसल्याने त्यांच्यासाठी हे धोकेदायक ठरु शकते. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दुभाजकांचा मूळ हेतूच बाजूला....

शहरातील अनेक दुभाजक तुटले आहेत. काही दुभाजकांचे सुशोभीकरण रखडले आहे. नागरिक दुभाजक ओलांडून जीव धोक्यात घालतात तर काही दुभाजकात झाडे गरजेपेक्षा अधिक वाढल्याने धोकादायक ठरत आहेत. यामुळे या दुभाजकांचा मुळ हेतू बाजूला राहून ती केवळ नावापुरतीच उरली आहेत.