होमपेज › Pune › लाच घेताना जिल्हा व्यवस्थापक  जाळ्यात

लाच घेताना जिल्हा व्यवस्थापक  जाळ्यात

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:59AM



पुणे : प्रतिनिधी 

राज्य सरकारने माफ केलेल्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्जाचा  बोजा 7/12 उतार्‍यावरून कमी केलेल्या रकमेची दाखल्यामध्ये नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आले. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयातच सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

सुनील लक्ष्मण काची, (वय 44 वर्ष , वर्ग 2, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, पुणे.  रा. घर नंबर -ई/16, सुवर्ण पार्क पिंपळे गुरव, पुणे.)  असे पकडलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. 

तक्रारदार यांच्या आजोबांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेतले होते. त्याची नोंद त्यांच्या 7/12 उतार्‍यावर होती. राज्य सरकारने महामंडळाकडून घेतलेली सर्व कर्जे माफ केली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी 7/12 उतार्‍यावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अर्ज करून दाखला महामंडळाकडून घेतला होता. मात्र त्यात रकमेचा उल्लेख नव्हता. तो उल्लेख करून दाखला देण्यासाठी महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक काची याने पाचशे रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपतने याची पडताळणी करून गुरुवारी दुपारी कार्यालयातच  सापळा रचला आणि त्याला पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.