Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Pune › गणवेश वाटपाचे काम धिम्या गतीने

गणवेश वाटपाचे काम धिम्या गतीने

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:27AMपुणे : निमिष गोखले

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांच्या गणवेश वाटपाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे तीन वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांना नवा गणवेश मिळाला नसून, काहीच ठिकाणी त्याचे वाटप झाल्याचे समोर आले आहे.  राज्यातील निम्म्याहून अधिक आगारात त्याचे वाटप झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात एसटीचे सुमारे पन्नास हजारच्या वर कर्मचारी काम करत असून, चालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी, शिपाई आदींचा यात समावेश आहे. मात्र, नव्या गणवेशाचा पत्ताच नसल्याने त्यांना जुना गणवेश नाईलाजास्तव परिधान करावा लागत आहे. 

बहुतांश कर्मचार्‍यांचे कपडे उसवले असून, त्यांना फाटके, विटलेले कपडे घालावे लागत आहेत. दरम्यान, गणवेशधारक कर्मचार्‍यांना कापड द्यायचे व अडीचशे रुपये शिलाई भत्ता द्यायचा, असे सुमारे तीन वर्षांपूर्वीपर्यंत चालत होते. कर्मचार्‍यांनी त्यांचे कपडे स्वतःच्या मापानुसार शिवून घ्यायचे, असा यामागचा उद्देश होता. परंतु, कर्मचार्‍यांना कोणतीही सूचना न देता अचानक ही पद्धत बंद करण्यात आली असून, शिलाई भत्ता देणे बंद केले गेले आहे. एका बड्या फॅशन डिझायनिंग कंपनीला गणवेशाचे कंत्राट देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एसटीच्या काही बड्या अधिकार्‍यांचे यात हितसंबंध गुंतल्याची चर्चाही सध्या दबक्या आवाजात होताना दिसत आहे. 

दरम्यान, ज्या ठिकाणी एसटीचा नवा गणवेश वाटण्यात आला आहे, तेथील कर्मचार्‍यांमध्ये गणवेशाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ड्रेस कोड एकसमान नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे दिसते. एसटी कर्मचार्‍यांचा गणवेश पदनिहाय वेगवेगळा असून, कनिष्ठ पदावरील कर्मचार्‍यांना भडक खाकी रंगाचा गणवेश व वरिष्ठ पदावरील कर्मचार्‍यांना फिकट खाकी रंगाचा गणवेश देण्यात आला आहे. एसटीने कर्मचार्‍यांच्या गणवेशाबाबतचा दुजाभाव केला असून, यामुळे कर्मचार्‍यांमध्ये उच्च व नीच असा नवा वाद उफाळण्याची दाट शक्यता आहे. खाकीबाबत सामान्य नागरिकांमध्ये असणारा आदर देखील कमी होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, गणवेशाचा नमुना बघण्यास महिला प्रतिनिधींना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलावण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्या-त्या आगारात गणवेशाचा नमुना देण्यात यावा, जेणेकरून आम्हाला मुंबईला जावे लागणार नाही, अशी मागणी महिला वाहकांनी केली आहे.