होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड भाजपमधील ‘खदखदीला’ जबाबदार कोण

पिंपरी-चिंचवड भाजपमधील ‘खदखदीला’ जबाबदार कोण

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:07AMपिंपरी : संजय शिंदे 

‘पक्षापेक्षा’ व्यक्तीला महत्व प्राप्त झाल्याची भावना पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 25 वर्षे सत्तेसाठी संघर्ष केला. वाट पाहिली; परंतु, सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आम्हाला ‘सन्मान’ मिळणे आवश्यक होता. मात्र कारभार्‍यांकडूनच फक्त त्यांच्याच कार्यकर्त्याचा विचार होत असेल, तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा ही खदखद त्यांच्यात निर्माण झाली आहे. 

प्रदेशाने याबाबत वेळीच हस्तक्षेप केला नाहीत तर आगामी निवडणुकांत त्याचा फटका पक्षाला बसणार हे कोणा ज्योतिषाला विचारायची गरज नाही. या खदखदीला वेळीच आवर  घातला नाही तर याला जबाबदार ‘कारभारी की लक्षात येऊनही झोपेचे सोंग घेणारे ‘प्रदेश’चे पदाधिकारी याबाबतही पक्षांतर्गत कुजबूज सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेवर काही करुन भाजपला सत्ता आवश्यक होती. त्याअनुषंगाने प्रदेशस्तरावरुन शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप आणि सहयोगी अपक्ष आ. महेश लांडगे यांच्याकडे पालिका निवडणुकीची सर्वे सूत्रे दिली. त्यामध्ये खा. अमर साबळे, माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह जुन्या निष्ठावंतांनीही जीवाचे रान करत सत्ता हस्तगत केली.

सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेतील सर्व निवड-नियुक्तीमध्ये कारभार्‍यांच्या गटातटात नगरसेवकांना संधी देण्यात आली. परंतु, किमान क्षेत्रीय सदस्य, जिल्हास्तरावरील निवड-नियुक्त्या, महामंडळावरील निवडीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त पक्षाचे अस्तित्व राखलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कमीजास्त प्रमाणात संधी देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केल्या; मात्र  तिन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडीमध्ये डावलल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. काहींनी उघड पाठिंबा दिला तर काहींनी दूरध्वनी करुन आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा विश्‍वास व्यक्त केला.जगताप आणि लांडगे यांनी आपल्या समर्थकांना संधी देत त्यांचा विश्‍वास सार्थ केला. 

मात्र जुन्या (निष्ठावंत) कार्यकर्त्यांनाही त्यामध्ये थोड्या फारअंशी समावेश केला असता तर ही खदखद बाहेर पडली नसती. निवडीवरुन वादंग होणार याबाबत प्रदेशस्तरावर कल्पना होती, अशी कार्यकर्त्यांतच चर्चा आहे. या खदखदीवर वेळीच आवर न घातल्यास आणि नवीन कारभार्‍यांबरोबरच जुन्यांना ही सामावून घेण्याची भूमिका शहर पातळीबरोबरच प्रदेशावर घेतली नाही तर या खदखदीचा फटका फक्त आणि फक्त पक्षालाच बसणार अशी भावना अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत.