Sat, Jul 20, 2019 02:36होमपेज › Pune › पोलिस दलात एकच चर्चा ‘खासगी वसुलीवाला’

पोलिस दलात एकच चर्चा ‘खासगी वसुलीवाला’

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:48AMपुणे : विजय मोरे 

पोलिस दलात ‘वसुलीवाला’ ही एक जमात नव्याने अस्तित्वात आली आहे. यामध्येही ‘खानदानी’ आणि ‘खासगी वसुलीवाले’ हे प्रकार पडलेले आहेत. विशेष म्हणजे खासगी वसुलीवाल्यांनी मोठा दबदबा निर्माण केला आहे. ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यातही वसुली करणार्‍या एका खासगी ‘वसुलीवाल्या’कडे पुढच्या महिन्यात होणार्‍या बदल्यांच्या अनुषंगाने ‘मलईदार पोस्टिंग’ मिळावी म्हणून, अनेक अधिकार्‍यांनी अत्तापासून फिल्डिंग लावली असून पोलिस, दलात याच ‘वसुलीवाल्या’ची चर्चा जोरात सुरू आहे. 

यासंदर्भात काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी खासगीत बोलताना सांगितले की, पोलिस दलात ‘वसुलीवाल्या’ला प्रचंड महत्त्व दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ‘वसुलीवाले’ असतात. अतिवरिष्ठ, वरिष्ठ, पोलिस निरीक्षक, आणि त्यानंतरच्या खालच्या पदावरील अधिकार्‍यांसाठी वेगवेगळे ‘वसुलीवाले’ असतात. या ‘वसुलीवाल्यां’ची खास एक ‘टिम’ तयार केली जाते. या टीममधील ‘वसुलीवाले’ महिनाअखेर होणार्‍या वसूलीतून आपली 10 टक्के रक्कम खास स्वत:साठी काढून घेत असतात.

या संदर्भात खासगीत बोलताना एका वरिष्ठाने सांगितले की, समजा वरिष्ठांनी अचानक त्यांच्या ‘वसुलीवाल्याला’ बोलावले तर, हे ‘वसुलीवाले’ आपल्या जवळील सर्व रक्कम ‘सॉक्स’मध्ये (मोजे) किंवा इतरत्र लपवून ठेवतात व वरिष्ठांनी पैशाची मागणी केली की, साहेबांसमोर पाकीट उघडून, ‘साहेब हजार-बाराशेच रुपये खिशात आहेत’, असे सांगून पैसे देण्याचे टाळतात. साहेब कुटुंबियांसह एखाद्या उंची हॉटेलात जेवणासाठी जाणार असतील, तर अगोदर पुढे जाऊन त्या हॉटेलमध्ये योग्य ती बडदास्त ठेवतात. त्यानंतर साहेब हॉटेलातून बाहेर येईपर्यंत हॉटेलबाहेरच उभे राहतात. साहेब निघाले की, बील देतात. 

या ‘वसूलीवाल्यां’चे वेगवेगळे प्रकार आहेत. हॉटेल, पब, जुगारी क्‍लब, मटका, दारू, अंमली पदार्थांच्या धंद्यांवरून वसूली करण्यासाठी वेगवेगळे ‘वसूलीवाले’ असतात. पोलिस दलात काही ‘खानदानी वसूलेदार’ही निर्माण झाले आहेत. वरिष्ठ कोणताही आला तरी हे ‘वसूलीवाले’ म्हणून आपली मांड पक्की ठोकून असतात. या खानदानी ‘वसूली’वाल्यांपैकी काहींची तर अवैध धंद्यात पार्टनरशिपही असल्याचे समोर आले आहे. या वसूलीवाल्यांचा अवैध धंदेवाल्यांबरोबरच ठाण्यातील इतर पोलिस कर्मचार्‍यांवर प्रचंड दबदबा असतो. वरिष्ठांच्या घरापर्यंतच थेट येणे-जाणे असल्याने बाईसाहेबांबरोबर, साहेबांच्या एकूणच नातेवाईक, मित्रमंडळींची जंत्रीच यानी ठेवलेली असते. ‘या वसूली’वाल्यांवर कारवाई झाल्याची उदाहरणे  क्वचितच सापडतात. ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी मात्र या वसूलीवाल्यांना थेट मुख्यालयात आणून बसवले.

या ‘खानदानी वसूली’वाल्यांनंतर ‘खासगी वसूलीवाल्यां’चा नंबर येतो. हे वरिष्ठांच्या अगदी विश्‍वासातले असतात. त्यांचे कामही वेगळ्या स्वरुपाचे असते. सध्या शहरातील जमीनींना सोन्याचे मोल आल्याने हे ‘वसूलीवाले’ जमीनीच्या मॅटरमध्ये तोड करण्यात माहिर असतात. मोठ-मोठ्या राजकारणींचे ‘झोल’ मिटविण्यात यांचा मोठा हातखंडा असतो. तर शहरातील बिल्डर लॉबींचे मध्यस्थ म्हणून यांचा एक वेगळाच तोरा असतो. पुण्यातील एका बड्या ‘खासगी वसूलीवाल्या’कडे करोडीची माया गुंतविण्यात कोणाही अतिवरिष्ठांना भीती वाटत नव्हती. एका व्यापार्‍याने तर शहरातील क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकार्‍यांवर एवढी छाप पाडली होती की,  बिनदिक्कतपणे अधिकारी तो सांगेल तेथे गुंतवणूक करीत होते. आजकाल मात्र एका ‘खासगी वसूलीवाल्या’ने मोठा दबदबा निर्माण केला आहे. हा ‘वसुलीवाला’ तीन मोठ्या आयुक्तालयांतील वरिष्ठांचा लाडका ठरला आहे. याच ‘वसूलीवाल्या’ने एका सहायक आयुक्ताची ‘मलईदार’ ठिकाणी नेमणूक केल्याची अधिकारी चर्चा करीत आहेत. 

येत्या दोन महिन्यात अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. हा बदल्यांचा सिझन या खासगी ‘वसूलीवाल्यां’साठी ‘सोन्याचे अंडे’ देणारा ठरणार आहे. त्याचमुळे अनेक अधिकार्‍यांनी ‘की पोस्ट’ मिळावी म्हणून त्याच्याकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. बडा व्यावसायिक असलेला हा ‘खासगी वसूलीवाला’ अनेक अधिकार्‍यांसाठी ‘देवदूत’ ठरतो आहे. याचीच चर्चा सध्या पोलिस खात्यात जोरात सुरु असल्याचेही या वरिष्ठांनी सांगितले.