Thu, Apr 25, 2019 18:18होमपेज › Pune › ‘ओटा स्कीम’मध्ये घाणीचे साम्राज्य

‘ओटा स्कीम’मध्ये घाणीचे साम्राज्य

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:23PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील निगडीतील सेक्टर क्रमांक 22 मधील ओटा स्कीम येथील प्रकल्पात नियमित स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ड्रेनेज लाईन वारंवार तुंबून परिसरात सांडपाणी साचून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. 

ओटा स्कीम, सेक्टर 22 येथे पालिकेच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वी राबविण्यात आला आहे. ‘बी 1’ ते ‘बी 15’ या एकूण 15 इमारती आहेत. येथे 5 मजली एका इमारतीमध्ये सुमारे 80 सदनिका आहेत. परिसरात नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे डुकरे व मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. 

परिसरातील ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने परिसरात सांडपाणी साचते. त्या घाण पाण्यातूनच रहिवाशांना नाईलास्तव ये-जा करावी लागत आहे. या घाणीतच लहान मुला-मुलींना खेळावे लागते. गेल्या महिन्याभरापासून हा त्रास होत असून, यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते कुदबुद्दीन होबळे व वाहिदा शेख यांनी संताप व्यक्‍त केला आहे. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकारी किंवा कोणाची भेट या परिसरात असल्यास साफसफाई केली जाते. नियमित येणारे सफाई कामगार वरवर दर्शनी भागांतील सफाई करून निघून जात असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यामुळे परिसरात तसेच, इमारतीच्या मागील बाजूस कचर्‍याचे ढिग कायम असतात. परिसरात अनेक छोटी-छोटी मंदिरे आहेत. त्याभोवतीच कचरा साचत असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पाळीव जनावरे व डुकरांमुळे या घाणीत भर पडत आहे. तसेच, काही इमारतीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी गच्चीवरील टाकीत चढत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छ भारत अभियानात भेदभाव

ओटा स्कीम, सेक्टर 22 या परिसरात स्वच्छतेअभावी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे तर, दुसरीकडे स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पालिका प्रशासनाच्या कामातील भेदभाव दिसून येत आहे. या परिसरात नियमित स्वच्छता करावी. तसेच, ड्रेनेज लाईनची तात्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा क्षेत्रीय कार्यालय व पालिका भवनात ‘कचरा फेको’ आंदोलन करण्याचा इशारा समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिला आहे.