होमपेज › Pune › डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया थांबली

डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया थांबली

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 1:07AMपुणे : समीर सय्यद

संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व अडीच कोटी उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; मात्र आतापर्यंत केवळ 40 लाख सातबारा उतार्‍यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली असून, हे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा उतार्‍यांवर 1 ऑगस्टपर्यंत डिजिटल स्वाक्षरी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फोल ठरणार आहे.

सातबारा ज्या सर्व्हरवरून देण्यात येते ते मागील बारा दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सातबारा मिळत नाही. यामुळे पीकविमा भरण्यासह पीककर्ज घेण्याची कामे ठप्प झाली आहेत. राज्यात 2002 पासून 7/12चे काम संगणकीकृत करण्यात आले आहे. नोंदी ऑनलाईन करण्यासाठी केंद्र पुरस्कृत ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम’ राज्यात कार्यान्वित करण्यात आला. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्यामध्ये तांत्रिक बिघाड येत असल्याने सर्व्हर बंद पडत आहे.

शेतकरी बेजार

शेतकर्‍यांना पीकविमा भरण्यासह पीककर्ज व विविध कामांसाठी सातबाराची आवश्यकता आहे. तर दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना रहिवाशी, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी सातबाराची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, परभणी, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन सातबारांच्या सर्व्हर बंद होते. प्रशासनाकडून मात्र सर्व्हर सुरू झाल्याचा  दावा करण्यात आला आहे.