Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Pune › अखंड हरिनामाच्या जयघोषात माउलींच्या पालखीचे प्रस्थान

अखंड हरिनामाच्या जयघोषात माउलींच्या पालखीचे प्रस्थान

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 1:01AMआळंदी देवाची : पांडुरंग सांडभोर/श्रीकांत बोरावके

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा 
आनंदे केशवा भेटताची 
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी 
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे’

ज्ञानोबा-तुकोबांच्या अखंड जयघोषात व टाळ-मृदुंगांच्या गजरात  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या  पालखीने शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता देऊळ वाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यावेळी अवघी अलंकापुरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती. शनिवारी पहाटे माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहे.माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटानादाने वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड आरती झाली. पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळात माउलींना पवमान अभिषेक,  पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता माउलींच्या समाधी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. 

माउलींच्या 187 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आणि परराज्यातून हजारो भाविक अंलकापुरीत दाखल झाले होते. ऊन-सावलीचा खेळ, वरुणराजाने केलेला जलधारांचा अभिषेक आणि टाळ- मृदुंगांच्या गजरात अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली होती. इंद्रायणी तीरावर वैष्णवांच्या मांदियाळीचा हा  सोहळा भाविकांना याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळत होता. दुपारी बाराच्या सुमारास माउलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पुन्हा भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. 

त्यानंतर प्रस्थानाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाद्वार, हनुमान आणि पान दरवाजा बंद करून पोलिसांनी मंदिर परिसर रिकामा केला. त्यानंतर दुपारी तीन वाजता मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून आत सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मानाच्या सत्तेचाळीस दिंड्या देऊळवाडा परिसरात दाखल झाल्यानंतर ज्ञानोबा-माउलींच्या जयघोषाने आणि टाळ-मृदुंगांच्या गजराने अवघा मंदिर परिसर निनादला. पांढरे शुभ्र बंडी-धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, पताका घेऊन असलेले वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी यांचे लयबद्ध संचलन, देऊळवाड्यात या वारकर्‍यांनी उभारलेले मनोरे, महिलांच्या फुगड्या आणि फेर आणि टिपेला पोहोचलेल्या टाळ-मृदुंगांच्या आवाजात देहभान हरपून नाचणारे टाळकरी यामुळे हा सोहळा अधिकच रंगला. पावणेपाच वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या अश्वाचा देऊळवाड्यात प्रवेश झाला. प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरात गुरू हैबतबाबांच्या व संस्थानच्या वतीने माउलींची आरती करण्यात आली. 

यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस अधीक्षक सुवेज हक, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर-कांबळे, प्रांताधिकारी आयुष प्रसाद, मुख्याधिकारी समीर भुमकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त विकास ढगे पाटील, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. मानपानाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माउलींच्या पालखीने वीणा मंडपातून प्रस्थान ठेवले. यावेळी अवघा देऊळवाडा माउली-माउलीच्या कल्लोळात डुंबून गेला. मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. नगरप्रदक्षिणा घालून माउलींच्या आजोळ घरी गांधी वाड्यात विसावली. शनिवारी पहाटे पालखी आळंदीवरून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून, या ठिकाणी दोन दिवसांचा मुक्काम असणार आहे.

देऊळवाड्यातून बाहेर पडण्यास अर्धा तास

माउलींच्या पालखीचे सायंकाळी साडेसहा वाजता प्रस्थान झाले. मात्र त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घालून देऊळवाड्यातून बाहेर पडायला पालखीला तब्बल अर्धा तास लागला. प्रचंड गर्दीमुळे पालखी बराच काळ एकाच जागेवर अडकून पडली होती.