पिंपरी : प्रतिनिधी
प्लास्टीकबंदीबाबत राज्य सरकारने शनिवार (दि.23) पासून कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार औद्योगिकनगरीत प्लॅस्टीक बंदीचा अंमल पहिल्याच दिवशी पहायला मिळत असून नागरिकांचा कापडी पिशवी वापरण्याकडे कल वाढला आहे. आज ना उद्या पलॅस्टीक बंदीची अंमलबजावणी होणारच या तयारीने नागरिकांनी कापडी पिशव्यांची खरेदी केली. त्यामुळे बाजारात कापडी पिशव्यांना मागणी वाढल्याचे चित्र दिसून आले.
शनिवारपूर्वीच काही व्यापार्यांनी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. नागरिकांनाही आता कापडी पिशव्यांची सवय होत असल्याचे चित्र दिसत असून त्या पार्श्वभूमीवर आता कापडी पिशव्यांची खरेदी केली जात आहे. बाजारात वीस रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत कापडी पिशव्या विकायला आल्या आहेत. साईजनुसार कापडी पिशव्यांची किंमत असून विविध आकारात आणि विविध रंगांमधील या पिशव्यांना मागणी होत असल्याची माहिती विके्रत्यांनी दिली.
महिला बचतगटांचा पुढाकार
प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर शहरातील काही महिला बचतगटांनी कापडी तसेच कागदी पिशव्या बनवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन मिळत असल्याची माहिती महिलांनी दिली. काही ठिकाणी व्यापारी कागदी किंवा कापडी पिशव्यांमधून वस्तू देत असल्याने कागदी पिशव्याच्या विक्रीत कमालीची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गुढीपाडव्यापासून हा निर्णय लागू करण्यात आला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जूनचा शेवटचा आठवडा उजाडला. त्यामुळे शनिवारी सुरु झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कितपत यशस्वी होते याबाबत नागरीकांत उलटसुलट चर्चा सुरु आहे. सध्या इतर राज्यात याबाबत काटेकोर अमंलबजावणी सुरु आहे. परंतु, आपल्या राज्यातील अनुभव पाहता नागरिकांनी याबाबत पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.