होमपेज › Pune › ‘पवनाथडी’मुळे वाद चव्हाट्यावर

‘पवनाथडी’मुळे वाद चव्हाट्यावर

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:01AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा रद्द करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. मात्र, भाजपाचे महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी पवनाथडी जत्रा रद्द न करता, खर्चात काटकसर करून ती घेण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणावरून भाजपा पदाधिकार्‍यांमधील वाद चव्हाटावर आले आहेत. 

महापालिकेच्या वतीने दर वर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. पवनाथडी जत्रेचे उद्घाटन सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे गुरुवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. जत्रेसाठी केला जाणारा तब्बल 80 लाखांचा खर्च कमी करून तो 50 लाखांमध्ये आटोपता घेतला जाणार आहे, असे सांगून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाणार आहे, असे महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरुवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांच्या शेजारीच बसलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषयावर बोलण्यास चक्क नकार दिला. 

पवनाथडी जत्रेवर तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून महापालिका आर्थिक उधळपट्टी करते. त्याचा प्रत्यक्ष शहरातील महिला बचत गटांना लाभ होत नाही. त्यामुळे सदर पवनाथडी जत्रा रद्द करून होणार्‍या खर्चाची बचत करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना बुधवारी (दि.27) दिले. त्याच दिवशी जत्रेतील स्टॉल वाटपासाठी ड्रॉ सोडत काढली गेली; तसेच ‘एसएमएस’द्वारे संबंधित महिला बचत गटांना महापालिका प्रशासनाने कळविले आहे. 

सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षांनीच जत्रा रद्दची मागणी केल्याने पवनाथडी जत्रा होणार की, नाही यावर शहरात चर्चा रंगली होती. यासंदर्भात अचानक पत्रकार परिषदेत घेऊन महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी खुलासा केला. 

पवार म्हणाले की, पवनाथडी जत्रेवर केला जाणार खर्च हा नागरिकांचा कररूपी पैसा आहे. तो विनाकारण खर्च होऊ नये म्हणून आमदार जगताप यांनी मांडलेली भावना योग्य आहे. त्यांच्या मतानुसार जत्रेवर होणार्‍या खर्चात काटकसर केली जात आहे. जत्रेवर एकूण 80 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होतो. त्यात काटकसर करून 35 लाखांचा खर्च कमी केला आहे. त्यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ 50 लाखांपर्यंत खर्च होईल. त्यापुढे खर्च वाढणार नाही, त्याची दक्षता घेतली जाईल. पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी भरमसाट खर्च वाढवून ठेवल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्याला आम्ही लगाम घालत आहोत, असे पवार यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. 

या संदर्भात पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन सदर निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडीचे आयोजन केले जाते,  त्यामुळे तो रद्द केला जाणार नाही. जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहाला होणार आहे. 

जयंती, महोत्सव, सण आदींवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जाते. त्यास लगाम लावण्याचे आदेश न्यायालयाच्या निर्णयावरून राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका इतर महोत्सव, जयंती आणि कार्यक्रमांवर खर्च कमी करणार का, असा सवाल केला असता, महापौर काळजे म्हणले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार कार्यक्रमांवर खर्च केला जाईल, त्याबाबत आयुक्त निर्णय घेतील. 
दरम्यान, पुणे महापालिकेप्रमाणे महिला बचत गटांना मोफत स्टॉल न देता शुल्क आकारण्याची मागणी समोर आली आहे. जत्रेसाठी महापालिकेने खर्च न उचलता प्रायोजकत्व घ्यावे, असेही सूज्ञ नागरिकांचे मत आहे.