Thu, Jun 27, 2019 10:22होमपेज › Pune › पार्किंग शुल्काचा निर्णय आता महापौरांच्या कोर्टात

पार्किंग शुल्काचा निर्णय आता महापौरांच्या कोर्टात

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:17AMपुणे : पांडुरंग सांडभोर

शहरात प्रायोगिक तत्त्वावर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने 31 रस्त्यांची यादी निश्‍चित केली आहे. त्यावर आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार्‍या समितीकडून या 31 रस्त्यांपैकी 5 रस्त्यांची नावे निश्‍चित केली जाणार असून, त्यावर पार्किंग शुल्काची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

शहरातील वाहतुक कोंडीची गंभीर समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीच्या धोरणास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र, ही मंजुरी देताना सहा महिने शहरातील पाच रस्त्यांवर  प्रायोगिक स्वरुपात ही योजना राबविण्यात यावी त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी करावी, तसेच महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी आणि गटनेत्यांची समिती तयार करून शहरातील कोणत्या पाच रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क सुरू करायची याचा निर्णय घ्यायचा आहे.

त्यानुसार पालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांचा सर्व्हे करून त्यामधील 31 रस्त्यांची यादी निश्‍चित केली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार आता या 31 रस्त्यांमधील कोणत्या पाच रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू करायची यासंबंधीचा निर्णय महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखालील समितीला निश्‍चित करायचा आहे. पार्किंग धोरण अभ्यास समिती स्थापन करण्यासाठी व पाच रस्ते निश्‍चित करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, असे पत्र आयुक्त राव यांनी महापौरांना नुकतेच दिले आहे. त्यामुळे आता पे अ‍ॅण्ड पार्किंगचा चेंडू महापौरांच्या कोर्टात गेला असून त्यावर महापौरांकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.