होमपेज › Pune › कबड्डीच्या मैदानातच विद्यार्थ्याचा मृत्यू

कबड्डीच्या मैदानातच विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिरूर : प्रतिनिधी

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा कबड्डी खेळताना मृत्यू झाला आहे. पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता; यामुळे वातावरण गंभीर झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी  नातेवाईकांनी केली होती. अखेर प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या मध्यस्थीनंतर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गौरव अमोल वेताळ (वय 13, रा. न्हावरे, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 31 मार्च) जवाहर नवोदय विद्यालय येथे कबड्डीचे सामने सुरू होते. सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या दरम्यान दोन संघात सामना सुरू असताना विद्यार्थी गौरव वेताळ अचानक मैदानावर पडला. त्याला लगेच रुग्णालयामध्ये नेले  असता त्याचा तेथे मृत्यू झाला. घटनेची तसेच जवाहर नवोदय विद्यालयाची चौकशीची  मागणी पालकांनी केली.  

रविवारी (दि. 1) सकाळी मृत्युमुखी पडलेल्या गौरवचे चुलते, आजोबा परशुराम इसवे, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे,पोलिस अधिकारी रमेश गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, केंद्रीय नवोदय विद्यालयाचे प्राचार्य टी. एम. नायर,  मृत गौरवचे नातेवाईक तुषार वेताळ यांची शिरूर पोलिस स्टेशन येथे बैठक झाली. बैठकीत खेळताना काढलेला व्हिडिओ, इतर गोष्टी याबाबत चर्चा करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे यानी दिल्यानंतर नातेवाईकांनी गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला.  पोलिस निरीक्षक गलांडे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे सांगून नातेवाईकांची काही तक्रार असल्यास त्याप्रमाणे तपास करून कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, Shirur, kabaddi, kabaddi match, student, death,


  •