होमपेज › Pune › तेराव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

तेराव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:39AMपुणे : प्रतिनिधी

मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीच्या कठड्यावर बसल्यानंतर तोल गेल्याने खाली पडून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री बालेवाडीतील  सोसायटीमध्ये घडली. अनुपम विलास पाटील (वय 20, रा.एलाईट  एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अनुपम  नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेतो. तो बालेवाडी येथे राहण्यास आहे.रविवारी रात्री मित्रांकडे जातो असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. अनुपमच्या मित्राचे नातेवाईक कोल्हापूरला राहतात. त्यांचा फ्लॅट  बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत तेराव्या मजल्यावर आहे. अनुपम आणि त्याच्या चार मित्रांनी पार्टी करण्याचे ठरवले होते. त्यांन जेवण आणि दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या होत्या.

रात्री साडेअकराच्या सुमारास अनुपम आणि त्याचे मित्र पार्टी करुन सदनिकेतील गॅलरीत थांबले  होते. अनुपम दारूच्या नशेत असताना गॅलरीच्या कठड्यावर बसला होता. त्यावेळी त्याचा अचानक तोल गेला आणि तो सोसायटीच्या आवारात कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला.   उपचारापूर्वीच तो मरण पावला होता, अशी माहिती चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.