Thu, Apr 25, 2019 17:53होमपेज › Pune › अंघोळीसाठी गेलेल्या मूकबधिर मुलाचा मृत्यू

अंघोळीसाठी गेलेल्या मूकबधिर मुलाचा मृत्यू

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:13AMलोणीकंद : वार्ताहर

बाईफ रस्त्याच्या कडेला असणार्‍या कुंभार तळ्यामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मूकबधिर मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 6) सकाळी 8 च्या सुमारास घडली. कोरेगाव भीमा येथील युवकांच्या मदतीने तळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. रोहित कमलाकांत गुप्ता (वय 15, रा. वाघोली-भावडी रोड) असे तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या मूकबधिर मुलाचे नाव आहे. 

याबाबतीत माहिती अशी की, मूकबधिर असलेला रोहित गुप्ता अनेक वर्षांपासून बाईफ रस्त्यावरील दुकानांतील कामांमध्ये मदत करीत असे व दुकानदार देतील ती मदत घेऊन उपजीविका भागवत होता. तलाठी ऑफिस शेजारी असणार्‍या कुंभार तळ्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून पाणी सोडले असल्याने राहुल तळ्याच्या कडेला अंघोळ करीत होता. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी कपड्यासह उतरला होता, त्याला पोहता येत नसतानाही खोल पाण्यामध्ये गेल्याने तो बुडाला.

तळ्याच्या कडेला असणार्‍या ग्रामस्थांनी त्याला पाण्यात बघितले होते. बराचवेळ झाला असताना पाण्याच्या बाहेर दिसत नसल्याने ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र काही हाती लागले नाही. पोलिस व रोहितच्या घरच्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. पोलिसांनी भेट दिल्यानंतर नेमके कोणत्या ठिकाणी बुडालेला आहे त्याचा तपास लागला नाही. याबाबत नायब तहसीलदार सुनील शेळके यांना कळविल्यानंतर त्यांनी तलाठी स्वप्निल पटांगे यांना घटनास्थळी पाठविले. पटांगे यांनी लागलीच तलावाच्या शेजारी पाहणी केली. 

स्थानिक नागरिक तळ्यामध्ये उतरत नसल्याचे पाहून कोरेगाव भीमा येथील तरबेज पोहणार्‍यांना पटांगे यांनी बोलविले. साडेअकराच्या सुमारास कोरेगाव येथील सहा तरुणांनी अवघ्या काही मिनिटातच रोहितचा मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व एनडीआरएफची मदत घेण्यासाठी एक दिवस लागला असता, परंतु कोरेगाव येथील तरुणांनी काही मिनिटात मृतदेह काढल्याने त्यांची कामगिरी मोलाची ठरली.