Thu, Jun 27, 2019 09:48होमपेज › Pune › गृहप्रवेशाआधीच नवविवाहितेचा मृत्यू

गृहप्रवेशाआधीच नवविवाहितेचा मृत्यू

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:01AMटाकळी हाजी : वार्ताहर

लग्न होऊन लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये प्रवेश करण्याआधीच लग्नमंडपात अचानक त्रास होऊन, नववधूचा मृत्यू झाला. त्यामुळे वधू-वरांच्या कुंटुबासह नातेवाईकांवर दुःखाचे संकट कोसळले आहे. म्हसे बुद्रुक (ता. शिरूर) येथे ही घटना घडली असून जयश्री हिरामण मुसळे (वय 19) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. 

म्हसे येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण व दिंगबर या दोन मुलांचा विवाह अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील संख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळस गोंडा व विजयलक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्याबरोबर म्हसे येथे रविवारी (ता. 6) दुपारी बारा वाजता झाला. जयश्री हिचा विवाह हिरामण याच्यासोबत झाला. लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्न पाहात या जोडप्याने ऐकमेकांना मिठाईचे घास भरविले. 

अक्कलकोटवरून आलेली वर्‍हाडीमंडळी परतीला निघाले. त्यानंतर अचानक जयश्रीला ताप, चक्कर येऊन त्रास होऊ लागला. सासरे बबन मुसळे व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरूरला दवाखान्यांत आणत असतानाच जयश्रीची प्राणज्योत मालवली. अंगाला हळद असताना सुखी संसारांची स्वप्न पाहणार्‍या जयश्रीच्या देवाघरी जाण्यांने हिरामणचेही स्वप्न संपले. ही घटना समजताच घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, सरपंच दामू घोडे, सखाराम खामकर यांच्यासह म्हसे ग्रामस्थ व नातेवाईकांनी गर्दी केली.