Tue, Mar 19, 2019 20:35होमपेज › Pune › कुठे नेऊन ठेवलयं आमचं सायकलींचं शहर?

कुठे नेऊन ठेवलयं आमचं सायकलींचं शहर?

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 24 2018 11:20PMसायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणात उभारलेले सायकल ट्रॅक कागदावरच उरले आहेत. बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमणांचा विळखा आहे. एकेकाळी पर्यावरणपूरक असलेले सायकलींचे शहर कुठे नेऊन ठेवलंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंढव्यात सायकल ट्रॅक राहिले फक्त नावालाच... 

मुंढवा : नितीन वाबळे

बीआरटी मार्गावरील फातिमानगर चौक ते गांधी चौक दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक उपाययोजणा करूनही त्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावरील हा सहा ते सात किलोमीटर लांबीचा हा बीआरटी मार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. येथील सायकल ट्रक नावापुरता राहिला असून दुचाकी वाहने सर्रासपणे येथून जाताना दिसतात. 

येथील पादचारी मार्गावर तसेच सायकल ट्रकवर केबल कंडेन्सर उघडे पडले आहेत. त्यामुळे पादचा-यांना येथुन जाताना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर बसथांबे रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

मेगा सेंटर व अण्णासाहेब मगर रूग्णालयाकडे जाणारी चारचाकी व दुचाकी वाहने येथील बीआरटी मार्गावरील सायकल ट्रक व पादचारी मार्गावरूनच जातात.  या वाहनांना ये-जा करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने आम्ही जायचे कुठुन असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.त्यासंबधीचे नियोजन प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

फातिमानगर चौक ते गांधी चौकापर्यंत सायकल ट्रक, पादचारी मार्ग तसेच रस्त्याच्या मधोमध मोठ्या दुभाजक असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यातुन मार्ग काढण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहने येथील सायकल ट्रक वरून जातात तर सायकल चालक पादचारी मार्गावरून जात असल्याचा विरोधाभास येथे पहायला मिळतो. येथे अनेक वेळा पादचा-यांना व सायकल चालकांना धडक बसल्याने अनेक नागरीक जखमी झाले आहेत तसेच काहिंचा मृत्युही झालेला आहे.

कोरेगाव पार्कात सायकल ट्रॅकची मागणी

कोरेगाव पार्क : संतोष चोपडे

शहरासह उपनगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त असून पुन्हा सायकल वापरण्यांसाठी नागरिकांचा कल वाढत आहे मात्र शहरातील विविध रस्त्यांवरील सायकल ट्रॅकचा वापर वाहनचालकांकडून होत आहे. त्यामुळे सायकलस्वारांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.कोरेगाव पार्कात परिसरात सायकल ट्रॅकची योजना होती मात्र त्याची अमंलबजावणी झाली नसून सध्या त्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील अनावाश्यकरित्या पदपथांची रूंदी अधिक ठेवलेली आहे. तसेच पदपथांवर अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात असून पादचार्‍यांना चालणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे पदपथांची रूंदी कमी करून लगतच स्वतंत्र सायकल ट्रॅक असावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नॉर्थ रस्त्यासह सर्व्हिस रस्त्यावरील पदपथांची रूंदी अधिक आहे संधी सादूनी स्वत:च्या फायद्यासाठीच पदपथांची रूंदी वाढवून पैशाचा अपव्यय केला आहे.बंडगार्डन,बोट क्लब रस्त्यावर सायकल ट्रॅक आवश्यक आहे. या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी लक्षात घेवून नवीन सायकल योजना राबविल्यास नागरिकांसाठी लाभदायक ठरू शकेल तसेच अतिक्रमणालाही आळा बसेल.

पौडरोडवर अतिक्रमणाचा विळखा

पौडरोड : नितीन वाबळे

पौडरोड रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटिकरण झाल्यावर सायकलस्वरयांच्या सोयीसाठी स्वतंत्र मार्ग  व पादचार्‍यांसाठी पदपथ करण्यात आला. पण बसथांबे, दुकानदार, रस्त्यावरिल विक्रेते, राजकीय पक्षांची  कार्यलये  आदींच्या अतिक्रमणामुळे  हा मार्ग खंडित झाला आहे. या सायकल मार्गावर जागोजागी वाहने लावलेल्या दिसून येत आहेत. ज्या जागी सायकल मार्गावर एस.एस. पाईप लावलेले आहेत त्याचा मधून देखील सायकल पास होत असल्याचे अनेक जागी चित्र दिसून येते. त्यामुळे सायकलमार्ग वापरण्यापेक्षा मुख्य रस्त्यावरून सायकल चालवणे सोपे वाटते. हा मार्ग असूनही व्यवस्थित वापरता येत नाही. त्यामुळे मूळ उद्येशालाच सुरंग लागल्याचा आरोप नागरिक करत आहे. 

पुणे शहर वाहतूक कोंडीचा समस्येत अडकलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पुणे पब्लिक सायकल शेअरिंग  योजना तयार करण्यात आली आहे. आणि स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर देण्यात आली आहे. आताची परिस्थिती राहुल कॅम्पलेक्स परिसरात दुकानदारांनी आपला व्यवसाय पदपथापर्यंत वाढवला आहे. राहुल कॉम्प्लेक्स ते जयभवानी नगरच्या बस्थानक पर्यंत सायकल मार्गच नाही. तसेच कोथरूड डेपोच्या परिसरात हा मार्ग गायब झालेला आहे. आनंदनगर मधील जागेवर बसथांबा उभारला आहे. वनाज कंपनीपाशी तर चक्क पदपथावरच एसटी व खाजगी बसथांबा, स्वच्छता गृह आणि परिवहन अधिकार्‍यांची केबिन उभारलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सायकल मार्ग, पदपथ अतिक्रमनांनी वेढलेले असतांनाही प्रशासन गप्प कसे, असा प्रश्‍न करीत सायकलमार्ग व पदपथ नागरिकांना वापरता येण्यासारखी व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय डाकले यांनी केली आहे.

हडपसरमध्ये सायकल ट्रॅकचा खर्च पाण्यात

हडपसर: प्रमोद गिरी

पुणे-सासवड रस्त्यावर माजी महापौर व या भागातील नगरसेविका यांनी सायकल ट्रॅक सुमारे एक किलो मीटर केला आहे. मात्र या सायकल ट्रॅकवर दुचाकी वाहने व मोठे वाहने ट्रॅकच्या बाजुला उभी करीत असल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेवुन ये-जा करावी लागत आहे.

पुणे-सासवड रस्त्यावर सायकल ट्रॅकसाठी लाखो रूपये खर्च करून ते पाण्यातच गेले. या हडपसर भागात सायकल ट्रकचा मार्ग हा असुन नसल्यासारखा आहे. या मध्ये जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते. हडपसरला मुख्य रस्त्यावर ही सायकल ट्रॅकची स्थिती धोकादायक आहे. 

पुणे-सासवड रस्त्यावर पालिकेने ट्रकवर वाहने पार्क केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा फलक लावला असला तरी वाहनांचा नियम झुगारून या सायकल ट्रकवर खासगी वाहने दोन्ही बाजुने रोडवरच लावुन जातात.सासवड रोडला सायकल ट्रक ऐवजी पदपथ चांगला असण्याची गरज आहे. मात्र पदपथही खासगी व्यवसायिकांनी दुकाने थाटुन अडथळा निर्माण केला आहे. हडपसर परिसरातील नगरसेवकांचे विकासाचे काम कागदावरच प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच आहे. सायकल ट्रकवरील वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान नगरसेविका वैशाली बनकर यांच्याशी संपर्क साधला आसता त्या म्हणाला की,सायकल ट्रँकवर अनाधिकत वाहनांवर कारवाई करण्या बाबत हडपसर वाहतुक विभागास सांगितले आहे.तसेच ज्या ठिकाणी सायकल ट्रँकची दुरावस्था आहे.ते काम तातडीने करुन घेतले जाईल.

सायकल ट्रॅकबाबत प्रशासन उदासीन 

खडकी : अमोल सहारे

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये अनेक रस्त्यांवर केवळ पदपाथ दिसून येतात तर बाजारामध्ये अनेक  पदपाथ चक्क दुकानदारांनीच गिळंकृत केले आहेत. अरुंद रस्ते आणि पदपथ मुळे सायकल ट्रॅक मात्र दुर्लक्षित होत आहे. अनेक ठिकाणी पदपथ नसून सायकल ट्रॅक मात्र खडकीकरांच्या नशिबी सध्या तरी नसल्याचे दिसुन येते. बोर्डाच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पदपाथ तयार करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी तर बोर्ड प्रशासनाच्या वतीने पदपथावर नव्याने टाईल्स बसवण्यात येत आहे.

मात्र काही ठिकाणी पदपथावर चक्क दुकाने थाटण्यात आली असल्याचे दिसून येते. बाजार परिसरामध्ये मधील अनेक दुकानदारांनी पदपथ चक्क गिळंकृत केले आहेत. आपली दुकाने पदपथापर्यंत वाढविण्यात आली असून प्रशासनाचे मात्र याकडे स्पेशल दुर्लक्ष डोळेझाक होत आहे तर साप्रस, रेंजहिल्स परिसरामध्ये तर पदपथावरच लहान दुकाने थाटण्यात आली आहेत. पदपथ नसल्याने नागरिकांना दुकानाच्या शेजारीच रस्त्याजवळ आपली वाहने लावावी लागतात. सायकल ट्रॅक नसल्याने मात्र सायकलस्वारांची चांगलीच दमछाक होते. सायकल ट्रॅकसाठी बोर्ड प्रशासनाची उदासीन भूमिका असून सायकल ट्रॅक बाबत बोर्डातील सदस्यांना देखील कोणत्याही उत्साह नसल्याचे लक्षात येते. 

धनकवडीतील सायकल ट्रॅक नक्की कोणासाठी...?

धनकवडी ः बाजीराव गायकवाड

सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज व कात्रज ते स्वारगेट असे पूर्वी सायकल ट्रॅक उभारण्यात आले होते. मात्र नवीन बीआरटी मार्गाचे अत्याधुनिकरण करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूस तीन तीन अशा सहा लेन बनविण्यात आले आहेत. त्यात सुसज्य पदपथ, पार्किंग, स्वतंत्र बीआरटी मार्ग व दोन्ही बाजुस सायकल टॅक उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र पूर्वीचा सायकल ट्रॅक अपयशी ठरला आहे. नव्याने सुरू असलेल्या सायकल ट्रॅकवरून सायकल चालणार की दुचाकी व रिक्षा वाहतूक होणार ? असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे.

सातारा रस्त्यावरील पूर्वी सायकल ट्रॅकचा वापर पार्किंगसाठी होत असल्याचे समोर आले आहे.तसेच पूर्वीच्या ठिकाणी बीआरटी मार्गावन श्री सदगुरू  शंकर महाराज मठ, बिबवेवाडी कॉर्नर दुगड चौक,साईबाबा मंदीर चौकातील उड्डाणपुलामुळे या विविध  ठिकाणी तुटक तुटक साकल ट्रॅक झाला होता.आता नव्याने करोडेा रूपये खर्च करून पुर्नरबांधरनी खर्चामध्ये सायकल ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे.या ट्रॅकचा वापर  सायकलस्वारांसाठीच होणार की इतर वाहने त्याचा गैरफायदा घेणार ? याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

रस्ता रूंद झाला आहे.तसेच पदपथ जेथे आहेत  त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाके व सुशोभिकरणाची झाडे लागवड करण्याचे कामही सुरू आहे.सायकल ट्रॅकसह इतर विकास कामे मार्च अखेर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे पथ विभागाचे उपअभियंता राजेंद्र अर्धापुरे यांनी सांगितले.

वारजेतील ट्रॅकला अतिक्रमणाचे ग्रहण

वारजे : प्रदिप बलाढे

सायकलींचे पुणे शहर म्हणून ओळख असणा-या शहरात माञ सायकलीच दुर्मीळ होताना दिसत आहेत. इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास महापालिकेकडून उभारण्यात आलेले तुरळक सायकल ट्रॅक केवळ नावालाच दिसत आहेत. या धावत्या युगात वाहनांची  वाढत्या संख्या व प्रदुषणाणे पर्यावरणावर मोठा विपरीत परीणाम होऊ लागला आहे. वारजे परिसराच्या विस्तारानुसार वाढते नागरिकीकरणाणे प्रत्येक घरटी वाहनांची संख्या वाढतच चालली आहे.

तुरळक नागरिकांकडे जरी सायकली असल्या तरी सायकलस्वार नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जिवघेण्या वाहतुकीचा सामना करत सायकल चालवावी लागते. वारजे परीसरात तुरळक ठिकाणी अधुन मधुन तुटक असे सायकल ट्रॅक महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक अतिक्रमणामध्ये हरवल्याचे चिञ दिसत आहे. सायकल ट्रॅक व लगत असलेल्या पदपथावर वारजे आंबेडकर चौकापासुन ते गणपती माथापर्यंत रस्त्यालगत अतिक्रमण करणारे लहान मोठे व्यापारी  व्यवसायीक व भाजीविक्रेते आणि रस्त्यातच वाहने उभी करून खरेदी करणारे नागरिक यामुळे पदपथ अतिक्रमणीत होऊन सायकल ट्रॅकही दिसेनासे झाले आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या सायकल ट्रॅकवर मोठ्या थाटात अतिक्रमणे तर झाली आहेतच. त्यातच दुचाकी चालक या ट्रॅकवर बिनधास्तपणे आपली वाहने पार्किंग करत असतात. परिसरात ज्या ठिकाणी सायकल ट्रॅक आहेत त्या ठिकाणी सायकल  ट्रॅक संबधी क्रॉसींग पट्टे, सुचना फलक व दिशादर्शक ही नसल्यामुळे या सायकल ट्रॅक ला अतिक्रमणाचे मोठ्या प्रमाणात ग्रहण लागले आहे.

बिबवेवाडी, सातारा रोडवरील सायकल ट्रॅक झाले गायब

बिबवेवाडी ः अनिल दाहोत्रे

स्मार्ट सिटीत सायकली वापरण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना करून प्रदूषण मुक्त पुणे शहर बनवण्याचा चंग बांधला पण अस्तित्वात असलेले सायकल मार्ग गायब केले आहेत. स्मार्ट सिटीत नव्याने बीआरटी मार्गाची उभारणीत सायकल ट्रॅक काढून टाकले. याप्रकारामुळे नागरिकाच्या पैशातून उभारलेल्या सायकल मार्गावरील करोडो रुपयाचा विकास निधी मात्र वाया गेला आहे. 
दक्षिण उपनगरात स्वारगेट ते कात्रज हा सायकल मार्ग मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2017 पर्यत होता. या मार्गाचा वापर सध्या पार्किंग व पथारीधरकांसाठी होऊ लागला आहे. एकीकडे सायकल वापरण्यचे आहवान करून सायकल मार्ग विकास कामाचे नाव देऊन काढून टाकले आहेत.

2017 नंतर स्मार्ट सिटीत जुन्या बीआरटी मार्गावर दुरुस्ती काम महापालिकेकडून सुरु आहे. या कामामध्ये असलेला सायकल मार्ग मात्र गायब झाला असून त्या जागी सर्व्हिस रस्त्याची उभारणी करण्यात आलेली आहे. परिणामी पुणे शहराला ज्या सायकल मार्गामुळे आलेली सायकल शहराची ओळख पुसली आहे. कात्रज ते स्वारगेट या मुख्य रस्त्यावर आदिनाथ सोसायटी समोर व सिटीप्राईड सिनेमा समोर 100 मीटरचा सायकल मार्ग सध्या नावापुरता शिल्लक आहे.