होमपेज › Pune › चालू अर्थसंकल्पात केवळ ३० टक्के खर्च  

चालू अर्थसंकल्पात केवळ ३० टक्के खर्च  

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:30AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017-18च्या अर्थसंकल्पातील भांडवली खर्चापैकी 15 जानेवारीअखेरपर्यंत केवळ 29.26 टक्के इतकाच खर्च महापालिका प्रशासन करू शकली आहे. तब्बल 70टक्के निधी खर्चाविना शिल्लक असल्याचे धक्कादायक बाब आहे. त्यावरून महापालिकेतील भाजपाचे नवे सत्ताधार्‍यांरी अधिकार्‍यांकडून विकासकामे करून घेण्यात कमी पडल्याचे स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे सन 2018-19चा अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

पालिकेची पंचवार्षिक निवडणूक फेबु्रवारी 2017मध्ये झाली. त्यामुळे सन 2017-18चा अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब झाला. तत्कालिन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सुमारे 3 हजार 48 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प तयार करून स्थायीकडे सादर केला. शिल्लकीसह आणि जेएनएनयुआरएम आणि केंद्राच्या योजनेच्या निधीसह अर्थसंकल्पाची एकूण रक्कम 4 हजार 805 कोटी इतकी होती. समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे यांनी सुधारीत अर्थसंकल्प सभागृहात 15 जून 2017 ला मांडला. त्यास चर्चेविना मंजुरी देण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

विलंबाने अर्थसंकल्प सादर झाल्याने अर्थसंकल्पातील तरतूद निधीवर खर्च करण्यास सत्ताधारी कार्यक्षमता कमी पडली आहे. सध्या सन 2018-19चे अर्थसंकल्पाचे काम जवळजवळ अंतिम टप्पात आले आहे. फेबु्रवारीच्या सुरूवातीला ते आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केले जाईल. तर, दुसर्‍या आठवड्यात ते स्थायी समितीसमोर मांडले जाईल. त्या दृष्टिने महापालिकेचा लेखा विभाग काम करीत आहे. 
मात्र, सन 2017-18 मधील भांडवली निधीतून केवळ 29.26 टक्केच खर्च केला गेला आहे. स्थापत्य विभागाने 1 हजार 24 कोटींपैकी केवळ 308 कोटी इतकांच म्हणजे 30.11 टक्के खर्च केला आहे.

विद्युत विभागाने 51 कोटी 95 लाखांपैकी 9 कोटी 15 लाख रूपये खर्च झाले आहेत. पाणीपुरवठाने 171 कोटी 34 लाखांपैकी 37 कोटी 46 लाख रूपये खर्च वर्षभरात केला आहे. या तीनही विभागांसाठी असलेल्या 1 हजार 278 कोटी 95 लाख भांडवली खर्चाच्या तरतूदीपैकी 374 कोटी 32 लाख इतका खर्च झाला आहे. हे प्रमाण केवळ 29.26 टक्के आहे. तर, महसुली खर्च 947 कोटी 25 लाख इतका झाला आहे. महसुली व भांडवली असा एकूण खर्च 1 हजार 321 कोटी 78 लाख 30 हजार 873 इतका झाला आहे.