Sun, Jun 16, 2019 02:16होमपेज › Pune › ‘क्रिप्टो करन्सी’चे जाळे जगभर पसरलेले

‘क्रिप्टो करन्सी’चे जाळे जगभर पसरलेले

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 1:05AMपिंपरी : अमोल येलमार

देशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या क्रिप्टो करन्सी असणार्‍या ‘बिटकॉईन’चे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. काही ठराविक देशामध्ये सोडल्यास सर्वच ठिकाणी या करन्सीला मान्यता नाही; मात्र करन्सी खरेदी-विक्री (गुंतवणूक) करणारे मोठ्या प्रमाणावर असल्याने हा गोरधंदा सुरू आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणी बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, तर पुणे पोलिसांकडे दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये मुख्य सूत्रधारासह एजंटना अटक करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून, आणखी काही दिवसांत 10 ते 12 मोठ्या रकमेचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

अवघ्या दीड-दोन वर्षांत दहा ते बारा पटीने वाढ झालेल्या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनास भारतात मोठी मागणी वाढली होती. बिटकॉईन खरेदी-विक्री करणार्‍या एजंटाचे जाळे तयार झाले होते. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन त्यातून मिळणार्‍या मोठ्या परताव्याची माहिती दिली जात होती. त्यामुळे यामध्ये मोठे व्यावसायिक, उद्योजक, फिल्म स्टार, उच्चशिक्षितांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पावधीत या कॉईनचा दर चौदा लाखांच्या घरात गेला. महाराष्ट्रातही या कॉईनला मोठी मागणी वाढली. याच सोबत यासारख्या आणखी कॉईन बाजारात आले. पाच रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असणारे हे कॉईन सहजरीत्या उपलब्ध होऊ लागले; मात्र यातील बर्‍याच कॉईनमधून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली.

पुणे पोलिसांच्या दत्तवाडी पोलिस ठाण्यात बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एक महिन्यापूर्वी निगडी पोलिस ठाण्यात 99.5 बिटकॉईन म्हणजे तब्ब्ल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पुणे सायबर गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. यातील ‘गेन-बिटकॉईन’च्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधारास परदेशातून अटक केली. पुणे शहरातील अनेकांची फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हे शाखेकडे शेकडो अर्ज तपासासाठी पडून आहेत, तर येत्या काही दिवसांत यातील काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पन्नास लाख रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे किमान 10 ते 12 गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे पुणे शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. अमित भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नांदेड येथेही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अजूनही होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरातही फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत; मात्र पुण्यात सर्वाधिक आहेत. पुण्यामधील आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांनी, अभियंत्यांची यामध्ये मोठी गुंतवणूक आहे; तसेच व्यापारी, उद्योजक यांचाही सहभाग तितकाच आहे. क्रिप्टो करन्सीची व्याप्‍ती ही जगभर पसलेली आहे. काही देशामध्ये बाजारपेठांमध्ये वस्तू खरेदी-विक्रीसाठी ही हे कॉईन ग्राह्य धरले जात आहेत. तर काही देशामध्ये पूर्णपणे यास बंदी असून, ‘गेन बिटकॉईन’ अशा प्रकारच्या कंपन्यांचे परवानेही रद्द केले आहेत. या क्रिप्टो करन्सीच्या फसवणुकीची आणि आरोपींची व्याप्‍ती मोठी असून, त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे. जगातील अनेक देशांमध्ये ‘बिटकॉईन’चा हा गोरखधंदा सुरू आहे. 

सुमारे पाचशे कोटींची फसवणूक

बिटकॉईन आणि त्यासारख्या क्रिप्टो करन्सीमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे. यामध्ये सुमारे पाचशे कोटींची फसवणूक झालेली असून, हजारो कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी, पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल झाले असून, त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुण्यातील बडे उद्योजक, प्रतिष्ठितांची गुंतवणूक

क्रिप्टो करन्सीमध्ये पुणे शहर महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक गुंतवणूकदार हे पुण्यातील आहेत. यामध्ये शहरातील मोठे उद्योजक, प्रतिष्ठित व्यक्तींनी गुंतवणूक केलेली आहे. तसेच उच्चशिक्षित ‘आयटी’ क्षेत्रातील अभियत्यांचीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. 

‘पुढारी’चा पाठपुरावा, इफेक्ट

‘बिटकॉईन’ एक  अभासी चलन, मात्र अल्पावधीतच दहा-पंधरा हजारांहून थेट पंधरा लाख रुपयांपर्यंत मजल मारली. कमी वेळेत मोठा परतावा आणि मोठी मागणी असल्याने अनेकांनी यामध्ये लाखो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. काहींना आपला काळा पैसा यामध्ये गुंतवला तर काहींना आयकर बुडवण्यासाठी याचा वापर केला. तर काही चोरट्यांनी खंडणी स्वीकारण्यासाठी याचा वापर केला. भारतात बेकायदेशीर असलेल्या बिटकॉईनच्या काळ्या धंद्याचा पदार्फाश ‘दै. पुढारी’ने केला.

‘बिटकॉईन’ म्हणजे काय, ते कशाप्रकारे सुरू आहे, यातील व्यवहार कसे होतात, यामध्ये काळा पैसा कशाप्रकारे गुंतवलेला आहे, आयकर बुडवण्याचा प्रकार आहे, तसेच भारतावर झालेल्या सायबर हल्ल्यातही चोरट्यांनी, हल्लेखोरांनी खंडणी बिटकॉईनच्या स्वरूपात मागितली. भारतामध्ये नोटबंदी झाल्यानंतर बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. यासाठी अनेक ठिकाणी सेमिनार, मीटिंग होत होत्या. एजंट गुंतवणूकदार शोधत होते. भारतासह महाराष्ट्र, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणावर यामध्ये गुंतवणूक असल्याचे ‘दै. पुढारी’त प्रसिद्ध करण्यात आले.

‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत केंद्रशासनाने यावर चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नागरिकांचे म्हणणे मागवले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार्‍या मुख्य कंपन्यांना नोटिसा पाठवून खुलासा करण्यास सांगितले. याचसोबत शासनाने बिटकॉईनचे मुख्य एक्सेंजर यांच्यावर बेंगलोर, दिल्ली, पुणे, हिंजवडी परिसरात छापे टाकून गुंतवणूकदारांची नावे मिळवली. यानंतर आयकर विभागाने या गुंतवणूकदारांना नोटिसा बजावल्या. दरम्यान, दिल्ली, नागपूर, पुणे, निगडी परिसरात फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले. कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले, याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.